आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहेगाव बंगला परिसरातील, दरोडेखाेरांनी लुटली दुकाने, वर्षभरातील तिसरी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाळूजलगतच्या दहेगाव बंगला येथे सशस्त्र दरोडेखाेरांनी रखवालदाराच्या गळ्याला धारदार चाकू लावून दरोडा टाकला. दोन दुकानांमधून रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज बुधवारी लंपास केला. वर्षभरातील ही तिसरी घटना असून येथील व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

नगर-औरंगाबाद महामार्गालगत शहरातील बायजीपुरा भागात राहणारे इम्रानखान पठाण यांचे मेहराज एजन्सी हे कृषी केंद्र आहे. तेथे बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या विक्रीसह शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीही करतात. परिसरातील सारंगपूर, धामोरी, नर्सापूर, पिंपरखेड, वाळूज, पंढरपूर, शेंदुरवादा, ढोरेगाव, नारायणपूर, लांझी, नायगाव भागातील शेतकऱ्यांशी त्यांचा कायम संपर्क असतो. दिवसभर व्यवसाय करून पठाण हे रात्री साडेसातच्या सुमारास शहरात परततात, तर रात्रीला त्यांचे नातलग असलेले समशेर चाँद सय्यद हे रखवालदार म्हणून दुकानाच्या समोरील भागात झोपलेले असतात. 

कापसाच्या खरेदीचे तपासले दोन्ही शटर
पठाण हे कापूस खरेदीही याच ठिकाणी करत हाेते. मेहराज दुकानच्या लगत दोन शटरमध्ये हा व्यवसाय सुरू होता. दरोडेखारांनी हे दोन्ही शटर लोखंडी टॉमीने वाकवून रोख रक्कम मिळते का म्हणून शोधाशोध केली. परंतु त्या ठिकाणी रोख रक्कम नसल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला. 

वाळूज पोलिस ठाण्याचा फोन कुणी उचलेना
मेहराज कृषी केंद्रावर दरोडा टाकला जात असतानाची माहिती अनेकांना मिळाली होती. तेव्हा काही जणांनी वाळूज पोलिस ठाण्यातील ०२४०-२२४०५६० या क्रमांकावर फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोनची रिंग जाऊनही पोलिसांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप व्यापारीवर्गाने केला. जर पोलिसांनी फोन घेतला असता तर संजीवनी कापड दुकान फुटले नसते. शिवाय, दरोड्याची घटना घडत असताना दरोडेखोरांना पकडता येणे शक्य झाले असते. त्यामुळे रहिवाशांनी नाइलाजाने ही माहिती पोलिस आयुक्तालयास दिली. तेव्हा सर्व सूत्रे हलली. परंतु उशीर झाल्याने पोलिस येण्यापूर्वीच दरोडेखोर त्यांचे काम फत्ते करून चालते झाले होते. 

पोलिसअधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट 
दरोड्याचीघटना घडल्यानंतर व्यापाऱ्यांनी हा सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर टाकला. ही माहिती पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव, वाळूजचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या कानावर गेल्याने त्यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. लगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचीही तपासणी केली. श्वान पथक ठसेतज्ज्ञांनाही बोलावण्यात आले होते. दरोड्याचा सर्वच बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वर्षभरातील तिसरी घटना 
दुकानेफोडण्याचे प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. दरोड्याची ही तिसरी घटना आहे. मागील दुकाने फुटण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे चोरट्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत. या सर्व प्रकारामुळे व्यापारीवर्गात दहशत पसरली आहे. इम्रानखान पठाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

पठाण यांचे दुकान फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा महामार्गाच्या पश्चिमेस असलेल्या सुमनांजली कापड दुकानाकडे वळवला. नर्सापूर येथील विजय शिंदे हे दुकान मालक सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. तेव्हा दरोडेखोरांनी लोखंडी टॉमीने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. आतील महागडे कापड रेडिमेड कपड्यांसह दोन लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाले. हा लुटीचा प्रकार दोन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान असा तब्बल दीड तास सुरू होता. 

रखवालदाराला लुटल्यानंतर त्यांनी मेहराज एजन्सीजच्या दारावरील शटर वाकवले. तसेच त्याचे खालील भागात असलेले लॉक जमिनीतून उखडत बाजूला दरोडेखाेर दुकानात शिरले. त्यांनी दुकानच्या काउंटरचे लॉक काढून त्यातील रोख ९० हजार रुपयांची रक्कम हडपली. शिवाय आणखी काही मिळते का? म्हणून काउंटरमधील सर्व कप्प्यांतील कागदपत्रे, फाइल्स आदी सर्वांमध्ये किमती ऐवजाची शोधाशोध केली. त्यासाठी सर्व सामान अस्ताव्यस्त केले. 

...आणि गळ्याला लावला धारदार चाकू 
बुधवारी अंदाजे पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास रखवालदार समशेर सय्यद हे नेहमीप्रमाणे झाेपलेले होते. तेव्हा दरोडेखोरांनी दुकानाच्या समोर लावण्यात आलेला बल्ब फोडण्यासाठी दगड भिरकावला. हा दगड बल्बला लागून लगतच्या पिकअप व्हॅनवर जाऊन आदळल्याने मोठा आवाज झाला. या आवाजाने रखवालदार समशेर सय्यद यांना जाग आली. रखवालदार उठल्याचे बघून चार दरोडेखोर त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने त्यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून “ऊठ मत, तेरे पास जो है वो जल्दी निकाल’ असे म्हणून त्यांनी दहशत पसरवत समशेर सय्यद यांच्याजवळील मोबाइल रोख हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. 
बातम्या आणखी आहेत...