आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणेच हरवले, रेल्वेस्टेशन एकीकडे आणि पोलिस ठाणे दुसऱ्याच कोनाड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कोपऱ्यात असलेले हे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस ठाणे. - Divya Marathi
एका कोपऱ्यात असलेले हे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस ठाणे.
डी.बी. स्टार - जागतिक पर्यटनस्थळांच्या नकाशावर असलेल्या औरंगाबादमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणेच हरवल्यासारखे झाले आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून किमान अर्धा किलोमीटर अंतरावर एका कोनाड्यात आरसीएफचे ठाणे आहे. विशेष म्हणजे ठाणे कुठे आहे, याबाबत कुठेही फलक लावलेला नाही. परिणामी एखाद्या प्रवाशाला एखाद्या गुन्ह्याविषयी तक्रार करायची असेल तर विचारत-विचारतच ठाणे गाठावे लागते. अधिकचे अंतर आणि शोधाशोध करूनही सापडत नसल्याने काही जण तर तक्रार करणेच सोडून निघून जातात. 
 
रेल्वे रूळ आणि स्थानकांवरील गुन्ह्यांचा तपास करणे, प्रवाशांना सुरक्षा पुरवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल कार्यरत आहे. रेल्वे अॅक्टमधील कलमांन्वये दाखल होणारे गुन्हे रेल्वे सुरक्षा दलाकडेच येतात. औरंगाबाद रेल्वे सुरक्षा दलाच्या हद्दीमध्ये महिन्याकाठी छेडछाड, चोरी, चेन स्नॅचिंग, बेकायदेशीरपणे आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करणे आदी स्वरूपाच्या जवळपास २०० घटना घडतात. 

औरंगाबादमध्ये दररोज परदेशी पर्यटक येतात. शिवाय रेल्वेने ये-जा करणाऱ्या व्हीआयपींचीही संख्या मोठी आहे. जर दुर्दैवाने एखादी मोठी अनुचित घटना घडली तर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना रेल्वेस्थानकावर पोहोचायला किमान सात ते दहा मिनिटे लागू शकतात. कारण या जवानांचे ठाणे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्याही पुढे म्हणजेच जुन्या स्थानकाचा पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म जिथे संपतो तिथे आहे. प्लॅटफॉर्मवर ठाण्याची कुठेच पाटी लावलेली नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला काही तक्रार करायची असेल तर ठाणे शोधता-शोधताच नाकीनऊ येतात. 
 
जागा आहे, पण... 
सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा दलाचे ठाणे प्लॅटफॉर्मवरच असायला हवे. औरंगाबाद स्थानकावरील जुने प्रतीक्षालय रिकामेच आहे. जर ठाणे प्लॅटफॉर्मवर आणायचे असेल तर या जागेचा पर्याय रेल्वे प्रशासनासमोर आहे. संभाव्य घटनांचे गांभीर्य, प्रवाशांची संख्या आणि सध्या होत असलेल्या गुन्ह्यांचा विचार करून ठाणे प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित व्हावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधून होत आहे. 

स्थानक आणि ठाणे यात अंतर आहे, हे खरे आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाकडून नुकतीच सीसीटीव्हीसाठी रूम घेतली आहे. संपूर्ण ठाणे हलवणे सध्या शक्य नाही. त्यामुळे आम्ही तत्काळ प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्रशासनाकडून आणखी एक रूम घेऊन तेथे सिक्युरिटी हेल्प डेस्क बनवणार आहोत. त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचा एक तरी जवान २४ तास असेल. जेणेकरून कुणाला काही तक्रार करायची असेल तर ठाणे शोधत बसण्याची गरज भासणार नाही.
-बी.के. पांडे, डिव्हिजनल सिक्युरिटी कमिशनर, रेल्वे सुरक्षा दल 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...