आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा दुष्काळग्रस्त भागात सुकाळ, हमखास पावसाच्या भागात तूट; सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदा जूनमध्ये लवकर आगमन झालेल्या नैऋत्य मान्सूनने जुलै-ऑगस्टमध्ये मोठे खंड दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये मेहेरबानी करत महाराष्ट्राला चिंब केले. कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाडा, नगर आणि सोलापूर भागात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर हमखास पावसाच्या विदर्भात मात्र आतापर्यंत सरासरी २३ टक्के तूट आली आहे.  विशेष म्हणजे ऑगस्टअखेर राज्यातील बहुतेक भागात पावसाची मोठी तूट होती. सप्टेंबरमध्ये नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा चांगलीच सक्रिय झाल्याने चांगला पाऊस झाला.
 
त्याच वेळी बंगालच्या  उपसागरातील मान्सूनची शाखा फारशी सक्रिय नसल्याचा फटका विदर्भाला बसला. सप्टेंबरच्या  दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या तीन प्रणाली (सिस्टिम) मराठवाडा, खान्देश, पश्चिम-मध्य महाराष्ट्रात सक्रिय झाल्याने या भागात अतिवृष्टी झाली. सप्टेंबरमधील या अतिवृष्टीमुळेच या भागातील पावसाची तूट भरून निघाल्याचे चित्र आहे. यंदा मान्सूनने हमखास पावसाच्या जुलै महिन्यात विश्रांती घेतल्याने राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत पावसाची तूट पडली. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत ऑगस्टअखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता.
 
खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार व पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ऑगस्टअखेर पावसाची सरासरी चिंताजनक होती. याच वेळी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची तूट ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.  मात्र सप्टेंबरमध्ये अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय झाली आणि राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण0 झाले, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी सलग तीन-तीन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, विदर्भ कोरडाच राहिल्याने तूट कायम राहिली.
 
दुष्काळी भागात जास्त पाऊस
पर्जन्यछायेत येणाऱ्या व दुष्काळी मानल्या जाणाऱ्या भागात यंदा भरपूर पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा यंदा जास्त सक्रियचा हा फायदा असल्याचे मत हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले. दुष्काळी पट्ट्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नगर, सोलापूर या  जिल्ह्यांत अातापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५ ते ६२% अधिक पाऊस झाला आहे.
 
पावसाची तूट भरून निघणार
यंदा कमी पावसाच्या भागात जास्त पाऊस तर हमखास पावसाच्या भागात कमी पाऊस झाला आहे. विदर्भात सर्वाधिक  तूट आहे. मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस अपेक्षित असून यामुळे तूट भरून निघण्यास मदत होईल. यंदा बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा निष्क्रिय राहिल्याने विदर्भात कमी पाऊस झाला आहे.
-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...