आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्तची कामे तारणार; मोठी धरणे ऑगस्टच्या मध्यात भरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नैऋत्य मोसमी पावसाने राज्यात आता जोर धरल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, पूर्व मराठवाड्याला चांगला फायदा होत आहे. पुणे वेधशाळेने येत्या दोन दिवसात मराठवाडा, विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यातील एकूण ९० मोठ्या प्रकल्पात केवळ १७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. असे असले तरी राज्यात ठिकठिकाणी झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामामुळे फारसे घाबरण्याचे कारण नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जलयुक्त शिवारच्या कामामुळे जेथे चांगला पाऊस झाला आहे त्या ठिकाणची भूजल पातळी उंचावली असून, विहिरी, बोअरला चांगले पाणी आले आहे. जुलै अखेर ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत राज्यातील प्रमुख धरणे भरतील असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

डॉ. साबळे यांनी सांगितले, नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल आता राज्यात सर्वत्र झाली आहे. मध्यप्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह राज्यातील बहुतेक भागाला चांगला फायदा झाला आहे. आतापर्यंत पावसाने काही ठिकाणी अपेक्षित सरासरी गाठली नसली तरी राज्यात झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे पाणी साठवण, पाणी जमिनीत मुरण्यास चांगली मदत झाली आहे. आगामी काळात पावसाने तूट दिली तरी जलयुक्त शिवारच्या कामामुळे झालेला पाणीसाठा खरीप व रब्बीत उपयोगी ठरणारा आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी जलयुक्तची कामे झाली तेथील भूजलपातळी वाढली असून विहिरी, बाेअरला पाणी आले आहे.
१५ ऑगस्टपर्यंत धरणे भरणार
डॉ. साबळे म्हणाले, जुलैच्या पहिल्या आठवड्यात सह्याद्री पर्वतरांग व घाटमाथा परिसरात झालेल्या चांगल्या पावसाचा लाभ गोदावरी, भीमा, कृष्णा खोऱ्यातील धरणांना होणार आहे. आता धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर राज्यातील प्रमुख जुलै अखेर ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत भरण्याची दाट शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील धरणे भरण्यास चांगली मदत होत आहे.

काही पॉकेट्स कोरडीच
पावसाच्या वितरणाबाबत डॉ. साबळे म्हणाले, मराठवाड्यातील बीडमधील काही तालुके, उस्मानाबाद, सोलापूर जिल्हे, लातूरमधील लातूर व औसा तालुका तसेच नगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अद्याप कमी आहे. तेथे ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल.
मध्य महाराष्ट्रातील तुटीने चिंतेत भर
मध्य महाराष्ट्रात ४८ मोठे तर ८२ मध्यम प्रकल्प आहेत. नेमका याच भागात नऊ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मध्य महाराष्ट्रात या हवामान विभागात नाशिक व पुणे विभाग येतो. मध्य महाराष्ट्रात नऊ जुलै अखेर सरासरी २१४.३ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ १९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही तूट १० टक्के आहे. पावसाच्या या तुटीमुळे मध्य महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झालेला नाही.

राज्यातील जलसाठा
प्रकल्प उपयुक्त जलसाठा गतवर्षीचा साठा
(९ जुलै २०१६ ) (९ जुलै २०१५)
मोठे प्रकल्प १७ टक्के २७ टक्के
मध्यम प्रकल्प १९ टक्के २४ टक्के
लघु प्रकल्प १६ टक्के २० टक्के
एकूण धरणे २९ टक्के २५ टक्क

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...