आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्तनंतर आता गाळमुक्त तलाव अन् गाळयुक्त शिवार,जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - जमिनीची पोत सुधारण्यासाठी आता ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ ही नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार असल्याचे माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सिल्लोड येथे पत्रकार परिषदेत  दिली.
 
भाजपच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पक्षाचा आमदार नसलेल्या मतदारसंघात जावून कार्यकर्ते व सामान्य नागरिकांशी मंत्री यांनी संवाद साधण्याचा कार्यक्रम पक्षाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शिंदे यांनी रविवारी सिल्लोड तालुक्यातील जलयुक्त शिवार कामांची पाहणी करून नवीन कामांचा शुभारंभ केला. 
 
या वेळी  ते म्हणाले, शाश्वत शेतीसाठी संरक्षित  पाण्याची गरज असल्यामुळे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत अाहे. ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. २०१९ पर्यंत महाराष्ट्र पाणीटंचाई व दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्यामुळे योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून आतापर्यंत योजनेवर तीन हजार चारशे कोटी खर्च करण्यात आलेले आहेत. समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर पाचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना राबविताना माथा ते पायथा ही संकल्पना सोडून कामे केल्याचे किंवा योजनेच्या मूळ उद्देशाला बगल दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 
 
जलयुक्त योजनेच्या पाठोपाठ ‘गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. तलावातील गाळ उपसा करताना शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, जेसीबी व अन्य सामग्रीची व्यवस्था करावी लागते. गरीब शेतकऱ्यांना तेवढा पैसा खर्च करणे शक्य होत नसल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गाळ टाकता येत नाही. त्यामुळे ही योजना आणणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, इद्रिस मुलतानी, शहराध्यक्ष विष्णू काटकर उपस्थित होते.  
 
सिल्लोड-सोयगावसाठी १०६ कोटी  
मंगरूळ येथे गाळ काढण्याच्या व सिमेंट बांधच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सिल्लोड व सोयगाव तालुक्यात जलयुक्ताच्या कामासाठी १०६ कोटी देण्यात आले आहेत. १३२ पैकी ८८ गावांमध्ये जलयुक्तची कामे पूर्ण होतील, अशी माहिती मंत्री शिंदे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...