आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंच्या निवडीनंतर ‘कहीं खुशी कहीं गम’, पुढील तीन वर्षे पक्षात दानवे पर्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेनुसार रावसाहेब दानवे यांना पुन्हा संधी देण्यात आली. मराठवाड्यातील नेता प्रदेशाध्यक्ष होत असल्याचा खरे तर सर्वांनाच आनंद व्हायला हवा होता. परंतु औरंगाबाद शहरात दानवे यांच्या निवडीनंतर कहीं खुशी कहीं गम असे चित्र दिसले. समर्थकांनी दानवेंच्या निवडीचा आनंद व्यक्त केला, तर दुसरीकडे काहींनी आता काही खरे नाही, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.

एक वर्षापूर्वी दानवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आली होती. त्यानंतर आता रीतसर तीन वर्षांसाठी निवडणूक झाली. त्यात दानवे यांना संधी मिळणार अशी चर्चा होती. तर दानवेंना संधी मिळू नये, अशी राज्यातील अनेकांप्रमाणेच औरंगाबाद जालना जिल्ह्यातील काही जणांची इच्छा होती. तसे ते बोलूनही दाखवत होते.

दानवे यांना पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा झाल्याने काहींनी आनंदही व्यक्त केला होता. परंतु सोमवारी दानवे यांच्याकडेच पुढील तीन वर्षे राज्य पक्षाची सूत्रे असतील, यावर शिक्कामोर्तब झाले.

दानवे प्रदेशाध्यक्ष झाल्याने पुढील तीन वर्षे औरंगाबाद संघटनेबरोबरच महानगरपालिकेतही ते म्हणतील तीच पूर्वदिशा असणार आहे. याचा एका गटाला अर्थातच आनंद झाला आहे. परंतु दानवे यांची कार्यपद्धती अन् विरोधकाला दूर ठेवण्याचा स्वभाव यामुळे याची काहींनी धास्तीही घेतली आहे. आता पुढील तीन वर्षे आमच्यासाठी सुतकच असेल, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने खासगीत बोलताना दिली.

अनेकांनी लावली फील्डिंग
यावर्षाच्या अखेरीस म्हणजेच ऑक्टोबरमध्ये शहराचे महापौरपद भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार दानवे यांच्याकडूनच ठरवला जाईल. त्यामुळे आतापासूनच काही जणांनी फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दानवे विरोधी गटाला आता तलवार म्यान करण्याशिवाय पर्याय नाही, अशीही चर्चा सुरू झाली आहे. थोडक्यात, पुढील तीन वर्षे पक्षात दानवे पर्व असणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
राजकारण