आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाज एमआयएम, भाजपचा; शिवसेनेने गड राखला, पण गुलमंडी गमावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी गेल्या वेळच्या तुलनेत शिवसेनेच्या दोन जागा घटल्याने मोठा धक्का बसला आहे. युतीत लढलेल्या भाजपने मात्र जोरदार कामगिरी करत २२ जागा पटकावल्या. सर्वाधिक चर्चेत असलेल्या एमआयएमने जबरदस्त मुसंडी मारत २५ जागा मिळवल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीचे पुरते पानिपत झाले आहे. सेना-भाजपचे किमान १० बंडखोर विजयी झाले आहेत. त्यांच्या बळावर युतीला सत्ता स्थापन करता येईल. दरम्यान, २९ एप्रिल रोजी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महापालिकेत एकूण ११३ वॉर्ड आहेत. त्यातील ज्योतीनगर, वेदांतनगर वॉर्डात मतदानाआधीच शिवसेनेने बिनविरोध विजय संपादन केला होता. आज १११ वॉर्डांची मतमोजणी झाली. निवडणुकीपूर्वी युती केल्यामुळे शिवसेना-भाजपला किमान ५५ ते ६० जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांना ५० जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या गुलमंडी वॉर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा भाजपचे बंडखोर राजू तनवाणी यांनी पराभव केला. मात्र, खैरेपुत्र ऋषिकेश समर्थनगर वॉर्डातून विजयी झाले. गेल्यावेळी भाजपला १५ जागा होत्या. त्यांना यंदा २२ जागा मिळाल्या. मावळते उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नी स्मिता आणि माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड वगळता भाजपला मोठा धक्का बसला नाही.

विधानसभेत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एमआयएमने विजय मिळवला होता. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. पहिल्यांदाच मनपा लढविणाऱ्या मनपाने २५ जागा पटकावल्या. त्यात पाच दलित उमेदवारांचा समावेश आहे. बहुजन समाज पक्षाची चमकदार कामगिरी हे देखील या निवडणुकीचे वैशिष्ट्य राहिले. बसपच्या तब्बल पाच जणांनी विजय मिळवला. एवढे यश पहिल्यांदाच मिळाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदरी घोर निराशा पडली. दोन्ही पक्षांचे मिळून फक्त १० जण विजयी झाले. त्यांच्यापेक्षा अपक्षांची संख्या अधिक म्हणजे १८ आहे. अपक्षांमधील दहा जण शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांच्या बळावर युतीला सत्ता संपादन करणे शक्य आहे.

नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता
मुंबई | नवी मुंबई महापालिकेवर तब्बल २० वर्षे एकहाती सत्ता गाजवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नाईक बंधूंनी १११ पैकी ५२ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरली होती. निवडणूकपूर्व युती करूनही भाजप- शिवसेनेला सत्ता खेचून आणता आली नाही. मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचा फटका युतीला बसला. नाईक बंधूंनी नियोजनबद्ध पद्धतीने विजयश्री खेचून आणली.

पक्षीय बलाबल असे
राष्ट्रवादी - ५२
शिवसेना - ३८
काँग्रेस - १०
भाजप - ०६
अपक्ष - ०५

सीईटीतील गुणवंत इथेही ठरले यशवंत
दिव्य मराठीतर्फे ४ एप्रिल रोजी भावी नगरसेवकांसाठी एएमसी-सीईटी घेण्यात आली. त्यात गुणवंत ठरलेले जयश्री कुलकर्णी, अंकिता विधाते, ऋषिकेश खैरे, मनोज गांगवे यांनी महापािलकेच्या निवडणुकीतही बाजी मारली. त्यांनी लेखी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. शिवाय प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबवत विजय संपादन केला.

फोटो - गुलमंडी पहिल्यांदाच गुलालाविना कोणत्याही निवडणुकीचा निकाल असला की गुलमंडीवर गुलाल उधळला जातोच. गुलमंडी म्हणजे शिवसेनेचे हृदयस्थान असे म्हटले जाते. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भाजपचे बंडखोर राजू तनवाणी यांनी शिवसेनेच्या सचिन खैरे यांना पराभूत केल्याचे वृत्त येताच गुलमंडीवर शुकशुकाट झाला. त्यातच पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तनवाणी समर्थकांनी गुलमंडी चौकात गुलाल उधळणे टाळले. इतिहासात पहिल्यांदाच गुलमंडी गुलालाविना राहिली. छाया : माजेद खान
पुढील स्लाइडवर वाचा निवडणूक निकालातील रंजक माहिती आणि प्रथमच घडलेल्या काही बाबींविषयी...