आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर कब्जा, उभारले निवासी संकुल, सिडको आणि मनपाकडे तक्रारी करूनही कारवाई होईना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशी इमारत बांधून (वर्तुळातील) हा रस्ता असा अडवण्यात आला आहे. त्यामुळे संकुलातील सर्वांचीच अडचण होत आहे - Divya Marathi
अशी इमारत बांधून (वर्तुळातील) हा रस्ता असा अडवण्यात आला आहे. त्यामुळे संकुलातील सर्वांचीच अडचण होत आहे
औरंगाबाद- पै-पै जमवून छोटेखानी दुकाने विकत घेतली. पण ज्या व्यापारी संकुलात ती सुरू केली  त्या व्यापारी संकुलातल्या इतर दुकानांकडे जाणारा रस्ताच एका व्यापाऱ्याने गिळंकृत केला आणि त्यावर चक्क निवासी संकुल उभारले. सिडको एन-५ (साऊथ)मध्ये असलेल्या शॉपिंग सेंटरमधील हा प्रकार. हे अनधिकृत बांधकाम पाडा, अशी मागणी एका ज्येष्ठ महिलेसह  इतर दुकानदारांनी  केली आहे. तर, दुसरीकडे सिडकोने या संकुल परिसरातच काही व्यावसायिकांना दुकानासमोरील पार्किंगची जागा ऑडशेप म्हणून विकल्याने वाहनांच्या रांगा  थेट रस्त्यावर लागत अाहेत.

सिडको एन-५ मधील सावरकरनगरला  लागून असलेले हे  व्यापारी संकुल १९८५ च्या सुमारास तयार झाले. या संकुलात लहान-मोठ्या आकाराचे दहा आणि फळे व भाजीपाला विकण्यासाठी पाच ओपन ओटे असे एकूण १५ गाळे आहेत. याच शॉपिंग कॉम्लेक्समध्ये सावरकरनगरात राहणाऱ्या सोनाबाई तासकर या महिलेने एक गाळा विकत घेतला होता. एक तर  व्यापारी संकुलाकडे येणारे बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. त्यातच सोनाबाई तासकर यांच्यासह इतर काही व्यापाऱ्यांच्या दुकानाकडे येण्यासाठीही रस्ता राहिला नाही. या रस्त्यावर शॉप क्रमांक ६ च्या धारकाने आपल्या दुकानाव्यतिरिक्त थेट रस्त्यावरच ३.३० बाय २.४० मीटर ग्राऊंड फ्लोअर आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम केले आहे. तर, क्रमांक १ च्या गाळाधारकाने  २.०० बाय २.४० मीटर आकाराचे ग्राऊंड फ्लोअर आणि पहिल्या मजल्याचे आरसीसी बांधकाम केले आहे. ही जागा नियमाप्रमाणे शॉपिंग कॉम्लेक्समधील इतर गाळ्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. सिडकोने मंजूर केलेल्या नकाशात हा  रस्ता आहे. हा  रस्ताच ताब्यात घेतल्याने ग्राहक आणि व्यापाऱ्यांची  गैरसोय होत आहे.

निवासी संकुल पाडा आणि आमच्या पार्किंगची सोय करा
व्यापारी संकुलातील रस्त्यावर बांधलेले हे दोन मजली घर पाडा आणि आमचा  रस्ता आम्हाला परत द्या, अशी कळकळीची विनंती सोनाबाई तासकर या ज्येष्ठ महिलेसह या व्यापारी संकुलातील  इतर व्यापाऱ्यांनी केली आहे. ते  गेल्या अनेक वर्षांपासून सिडको आणि महानगरपालिकेत चकरा मारत आहेत, पण अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही.

सिडको आणि महापालिकेचा नोटिसांचा सोपस्कार
शॉपिंग सेंटरमधील शॉप व स्टॉलधारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नागरिकांनी उपोषणाचे अस्त्र वापरल्यानंतर सिडकोचे तत्कालीन प्रशासक नामदेव जाधव यांच्या आदेशाने  अनधिकृत बांधकामविरोधी पथकप्रमुख गजानन साटोटे यांनी १३ सप्टेंबर २०१२ रोजी प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. तेव्हा  शॉप क्रमांक ६ च्या गाळेधारकाने थेट रस्त्यावरच ३.३० बाय २.४० मी. दोन मजली बांधकाम, तर शॉप क्रमांक १ च्या गाळाधारकाने  २.०० बाय २.४० मी. आकाराचे दोन मजली बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, १ एप्रिल २००६ पासून सिडकोचे मनपात हस्तांतर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम काढण्याची जबाबदारी मनपाची अाहे. त्यामुळेे सिडकोचे प्रशासक नामदेव जाधव यांनी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना  २७ सप्टेंबर २०१२ रोजी  हे अवैध बांधकाम काढण्याबाबत पत्रही दिले होते. त्या वेळी मनपाच्या अतिक्रमण विभागाने पाहणी, स्थळपंचनामा करून अतिक्रमणधारकाला नोटिसाही बजावल्या होत्या. पण पुढे काहीच कारवाई झाली नाही.
 
अद्याप हे प्रकरण आमच्यापर्यंत आलेच नाही. तक्रारदारांनी आमच्याकडे विषय मांडावा. मी प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करेन आणि रस्त्यावर अतिक्रमण असेल तर ते काढणारच.
- रवींद्र निकम, उपायुक्त मनपा 
 
तक्रारदारांना अधिकार नाही
हा वाद खूप जुना १९९२ पासून सुरू आहे. मनपा व सिडकोचे लोकही आले होते. पण आधी तक्रारदाराने व्हॅकंट गाळयांवरील बांधकाम काढावे. मग आमच्यावर आक्षेप घ्यावा. त्यामुळे त्यांना तक्रार करण्याचा अधिकारच नाही. आमच्या बांधकामाबाबत परिसरातील कोणत्याही नागरिकाची अथवा दुसऱ्या व्यापाऱ्यांची तक्रार नाही.
- चंद्रकांत लुनावत, अतिक्रमणधारक

सिडकोने बांधलेलेच गाळे घेतले
मुळात बांधकाम आमचे नाहीच. आम्ही थर्डपार्टी खरेदीदार आहोत. सिडकोनेच बांधकाम केलेला गाळा आम्ही खरेदी केला आहे. जर तसे असेल तर सिडको व मनपाने आमच्यावर खुशाल कारवाई करावी. आमचे भांडण रस्त्यासाठी आहे. थेट रस्त्यावर दोन मजले बांधून रस्ता गिळंकृत करणाऱ्याला सिडको आणि मनपा पाठीशी घालत आहे.
- सोनाबाई तासकर, तक्रारदार 

मनपा आयुक्तांना कळवले होते
त्या वेळी आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अतिक्रमणाची आणि नेमक्या परिस्थितीची स्थळपाहणी केली होती. त्यानंतर पंचनाम्यासह मनपा आयुक्तांना पत्राद्वारे कळवले होते. ते निष्कर्षित करण्याची जबाबदारी मनपाचीच आहे.  ऑडशेप जागा विकण्याबाबतचा प्रश्न प्रशासकीय विभागाशी संबंधित आहे. त्यावर मी भाष्य करू शकत नाही.
- गजानन साटोटे, अधिकारी, सिडको

नागरिकांचा आरोप
याच भागात सिडकोने काही व्यापारी प्रतिष्ठांनाना ऑडशेप म्हणून दुकानासमोरील जागा विकल्याचा आरोपही अनेक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या भागात वाहने रस्त्यावर लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होऊन गर्दी होते. हा रस्ता अत्यंत वाहतुकीचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निवासी वसाहती व संत तुकाराम नाट्यगृह आहे. याशिवाय धर्मवीर संभाजी विद्यालय, जिजामाता मुलींची शाळा, सिडको कम्युनिटी सेंटर या वास्तूही  एकाच रस्त्यावर आहेत. त्यामुळे येथे अपघात झाला तर जबाबदारी कोणाची, असाही सवाल करत परिसरातील नागरिकांनी सिडको प्रशासकांपासून ते मनपा आयुक्तांपर्यंत  साऱ्यांना तक्रारी केल्या आहेत.  

साधे पायीही चालता येत नाही
गेल्या २० वर्षांपासून आतले रस्ते बंद केले. हे व्यापाऱ्यांचे भांडण आहे. त्यात आमचा काही संबंध नाही. पण सिडकोने बांधलेल्या या शॉपिंग कॉम्लेक्सला पार्किंगच नाही. दुकानासमोरील पार्किंगची जागा सिडकोने व्यापाऱ्यांना ऑडशेपच्या नावाखाली विकली. शहराचा नियोजनबद्ध  विकास करणाऱ्या सिडकोच्या या नियोजनशून्य कारभाराने आज आम्हा रहिवाशांच्या डोक्याला ताप झालाय. साधे पायी चालता येत नाही.
- असंख्य रहिवासी, वीर सावरकरनगर
 
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...