आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात वाहून गेलेला ७ कि.मी. रस्ता ग्रामस्थांनी उभारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड (जि. औरंगाबाद)- दहा वर्षांत दोनदा भूमिपूजन होऊनही खराब रस्ता खराबच राहिला, त्यातच मागील दोन दिवसांच्या पावसाने पुरता वाहून गेला. ग्रामस्थांचे हाल होत होते. पिशोर परिसरातील चार गावांना जोडणारा आणि पिशोरच्या आठवडी बाजाराचा असलेला हा रस्ता अखेर ग्रामस्थांनीच एकत्र येऊन बांधून काढला. नादरपूर व पिंपरखेडच्या लोकांनी पुढाकार घेऊन पाच लाख लोकवर्गणी केली आणि ७ कि.मी. लांबीचा रस्ता दोन दिवसांत तयार केला. दुष्काळी स्थितीतही पदरमोड करून गावकऱ्यांनी श्रमदानातून केलेला रस्ता नवा आदर्श घालून देणारा ठरला आहे.

नादरपूर, पिंपरखेडा,निधोना व गौरपिंप्री या गावांतील लोकांना दैनंदिन कामकाज, शिक्षण, दवाखाना आदींसाठी पिशोरलाच जावे लागते. अनेक वेळा निवेदने देऊनही रस्त्याला मुहूर्त लागलाच नाही. अखेर ग्रामस्थांनीच एकत्र येऊन रस्ता केला.

आमदार, खासदार व पालकमंत्री एकाच पक्षाचे असूनही रस्ता होत नसल्याने लोकांत नाराजी असल्याचे पिंपरखेडच्या सरपंच उषाबाई अशोक लोखंडे यांनी म्हटले आहे.

२५ ट्रॅक्टर, ५०० ग्रामस्थ
परिसरातील ३०० ते ५०० शेतकरी एकत्र आले. ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने पैसे टाकले. ५ लाखांचा निधी जमा झाला. २५ ट्रॅक्टरच्या साह्याने ७०० ट्रिप करून ७०० ब्रास मुरूम लोकांनी श्रमदानातून टाकला व कच्च्या स्वरूपाचा तात्पुरता रस्ता तयार झाला.

दोनदा ट्रॅक्टर उलटला
रस्ता करताना अडचणी आल्या. खराब रस्त्यामुळे दोनदा ट्रॅक्टर उलटला. तरीही रविवारी उशिरापर्यंत पिंपरखेड व नादरपूरचे उपसरपंच अनुक्रमे मुसा शाह व संजय निकम यांच्यासह लोक निर्धाराने हे काम करत होते.

खड्डे बुजविणारा रिक्षाचालक
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम किराडपुऱ्यातील लोडिंग रिक्षाचालक शेख नजीर यांनी हाती घेतले असून, दोन महिन्यांपासून ते काम करत आहेत.