आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्लीबोळामध्ये कॉँक्रिटीकरण, मात्र त्रयस्थ तपासणीकडे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे कधी बुजवले जातील, हे सांगता येत नाही. परंतु वाॅर्डा-वाॅर्डातील गल्लीबोळांतील रस्त्यांवर पुढील किमान २५ वर्षे तरी खड्डे दिसणार नाहीत. सध्या २० कोटींची केवळ काँक्रिटीकरणाची कामे लहान रस्त्यांवर सुरू असून मार्चअखेर आणखी कोटींची कामे पूर्ण होतील. काँक्रीटच्या रस्त्यांमुळे अंतर्गत रस्ते चकाचक झाल्याने नागरिक खुश आहेत. 


इकडे आपण काय काम केले हे दाखवण्यासाठी काम सुरू असताना फेसबुक लाइव्ह, व्हॉट्सअॅपवर फोटो दाखवण्याचा नवा ट्रेंड नगरसेवकांमध्ये आला आहे. नगरसेवकांनी वाॅर्डात मतदारांसाठी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर याचा अक्षरश: धुमाकूळ दिसतो. विशेष म्हणजे मागील पिढीचे नगरसेवकही या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर कामे होत असताना या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) मात्र होणार नाही. त्यामुळे खरेच हे रस्ते २५ वर्षे टिकतील का, असा प्रश्न आहे. 


बहुतांश वाॅर्डात आता कामे सुरू असलेली दिसतात. त्यामुळे एकदमच ही कामे कशी काय सुरू झाली, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकदाच इतक्या कामांना कशी काय मंजुरी मिळाली, याचीही उत्सुकता आहे. प्रत्यक्षात या कामांची प्रक्रिया बरोबर अडीच वर्षांपूर्वी मे २०१५ मध्ये सुरू झाली. डॉ. हर्षदीप कांबळे आयुक्त असताना त्यांनी व्हाइट टॉपिंगची प्रथा येथे रुजू केली. खर्च जास्त होईल, परंतु अनेक वर्षे रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, हा त्यामागील उद्देश होता. एप्रिल २०१५ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. नव्याने विजयी झालेल्या तसेच जुन्या नगरसेवकांनी वॉर्डातील बहुतांश रस्त्यांची कामे अंदाजपत्रकात समाविष्ट करण्याचा सपाटा लावला. कारण निवडणूक असल्याने अंदाजपत्रक मार्चपूर्वी तयार झाले नव्हते. निवडणुकीनंतर अंदाजपत्रक तयार होत असल्याने नूतन महापौरांनी रस्त्यांच्या कामांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करून नगरसेवकांना खुश करून टाकले. 


कामाचादर्जा ठेकेदार, नगरसेवकाच्या भरवश्यावर
रस्त्यांच्याकामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक तपासणी (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) करणे अपेक्षित असते. मोठ्या रस्त्यांसाठी हा नियम पाळला जातो. येथे मात्र तसे होत नाही. निविदा काढतानाही तसे नमूद केले जात नाही. फक्त काम सुरू असताना काँक्रीट टेस्ट रिपोर्ट तेवढा घेतला जातो. बाकी सर्व ठेकेदार नगरसेवकाच्या भरवशावर सोडले जाते. 


पालकमंत्र्यांचे आशीर्वादही कामी 
२०१५च्या महापौर निवडणुकीत १२ अपक्षांनी युतीला मतदान केल्याने परतफेड म्हणून या नगरसेवकांना प्रत्येकी कोटी रुपयांचा निधी फक्त रस्त्यांसाठी देण्यात आला होता. असे १२ कोटी जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळाले. ती कामेही आता सुरू झाली आहेत. 


आत्ताच का सुरू झाली कामे? 
पैशांचीमारामार असल्याने अंदाजपत्रक तयार असूनही २०१५ च्या पहिल्या वर्षात ही कामे होऊ शकली नाहीत. तेव्हा मागील कामेच सुरू होती. त्यानंतर पुढील वर्षातही ही कामे होऊ शकली नाहीत. स्पील ओव्हरची कामे म्हणून दोन वर्षे ती अंदाजपत्रकात होती. अखेर त्यांना यंदा मुहूर्त लागला. कारण यंदाचे अंदाजपत्रक तयार होण्यास विलंब झाला. त्यामुळे नगरसेवकांनी पूर्वी मंजूर असलेली कामे हाती घेण्यास प्रशासनास भाग पाडले. त्यामुळे एकाच वेळी ही कामे सुरू असल्याचे दिसते. 


काम कोटींत झाले असते पण... 
सध्या२५ कोटी रुपयांतून जेवढी काँक्रिटीकरणाची कामे होत आहेत तेच काम जर डांबरीकरणाचे केले असते तर कोटी रुपये खर्च आला असता. परंतु साडेतीन वर्षांनंतर खड्डे पडण्यास सुरुवात होऊन पाच वर्षांनी पुन्हा रस्त्यांची कामे करावी लागली असती. परंतु ऐवजी २५ कोटी खर्च झाल्याने येथे किमान २५ वर्षे खड्डे पडणार नाहीत. लहान गल्ल्यांत अवजड वाहतूक नसतो. त्यामुळे हे रस्ते २५ वर्षांपेक्षा जास्त तग धरू शकतात. आज जास्त खर्च दिसत असला तरी भविष्यात बचतच होणार आहे. 


- २५ कोटीरुपये खर्च येणार आहे 
- २०० किमीरस्ते होणार 
- ३०० च्या आसपास काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत.
- सध्या शहरात या कामांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली असून मार्चअखेरीस कामाचा मोबदला मिळेल, असे ठेकेदारांना अपेक्षित आहे. 


सिमेंटमुळे पाणी जमिनीत मुरण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अर्थातच या रस्त्यावरील पावसाचे पाणी जोमाने वाहील. ते वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा साइड ड्रेन करणे गरजेचे होते. परंतु या लहान रस्त्यांवर कोठेही साइड ड्रेन केले नाहीत. रस्त्याला उतार असेल तर हे पाणी पुढे निघून जाईल, परंतु जेथे उतार नाही तेथे हे पाणी साचून राहील. जास्त पाऊस झाला तर हे पाणी घरात शिरण्याचा धोका आहे. रस्त्यांच्या जोडावर पेव्हर ब्लॉक बसवल, तेथेच पाणी मुरू शकते. पण प्रत्येक जोडावर ते बसवले नाहीत. पाणी मुरणे हा एक या रस्त्यांचा ‘ड्रॉबॅक’ ठरणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...