आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर अंधारात, चोरटे जोमात; टोल कंपनीच्या कार्यालयातून 11 लाख 77 हजार लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बन्सीलालनगर भागातील गोविंदनगर येथील के. टी. संगम इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी ११ लाख ७७ हजार रुपये चोरल्याची घटना सोमवारी (६ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गेल्या चार दिवसांपासून शहरात अंधार आहे. यामुळे परिसरातील काही घरांवर सीसीटीव्ही असूनही चोरट्यांचे स्पष्ट चित्रण त्यात दिसत नाही. कार्यालयातील नेमक्या कोणत्या खोलीत पैसे ठेवले होते, हे चोरट्यांना माहीत होते. त्यामुळे चोरटे कंपनीशी संबंधित असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
 
गोविंदनगरातील मारिया नेत्र रुग्णालयाच्या समोर प्लॉट नंबर १९ वर के. टी. संगम इन्फ्रास्ट्रक्चरचे कार्यालय आहे. ही कंपनी शासकीय बांधकामाचे कंत्राट घेते. तसेच औरंगाबाद-पुणे रस्त्यावर वाळूजजवळील लिंबेजळगाव आणि नेवासाजवळील खडका येथे टोलनाका वसुली करण्याचे बूथ आहे. शनिवार आणि रविवार बँका बंद असल्यामुळे या दोन्ही केंद्रावर जमा झालेली टोल वसुलीची रक्कम रविवारी दुपारी चारच्या सुमारास या कार्यालयात ठेवण्यात आली होती. 

खोलीचा दरवाजा तोडला
सोमवारीसकाळी दहाच्या सुमारास मुख्य व्यवस्थापक गोविंद अग्रवाल आणि गणेश अग्रवाल यांनी कार्यालय उघडल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील कॅशियरच्या खोलीचा दरवाजा त्यांना तुटलेला दिसला. लोखंडी कपाटाची खालची बाजू उचकटलेली दिसली. त्यावरून त्यांना कार्यालयात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती तत्काळ वेदांतनगर पोलिसांना कळवली. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, पोलिस निरीक्षक शरद इंगळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक शाहिद सिद्दिकी यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञ श्वान पथकालाही बोलावण्यात आले. मात्र श्वान जागेवरच घुटमळले. वेदांतनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
पथदिवे बंद असणे चोरांच्या पथ्यावर
वीजबिल भरल्यामुळे शहरातील सुमारे एक हजार पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे. चोरी झालेल्या गल्लीतील पथदिवे देखील बंद होते. तसेच कार्यालयात सीसीटीव्ही नव्हते. गल्लीतील काही घरांवर सीसीटीव्ही होते. मात्र पथदिवे बंद असल्यामुळे काळाकुट्ट अंधार होता. त्यामुळे कुठलेच फुटेज स्पष्ट दिसत नाही. याचा फायदा चोरट्यांनी घेतला. फुटेज अधिक स्पष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
पाळत ठेवून डल्ला मारला
ही चोरी पाळत ठेवून करण्यात आली आहे. रविवारी कार्यालय बंद असते. या दिवशी कार्यालयात मोठी रक्कम असते याची माहिती चोरट्यांना होती. तीन मजली इमारतीत १२ पेक्षा अधिक खोल्या आहेत. मात्र कुठल्या खोलीत, कुठल्या कपाटात पैसे आहेत हे चोरट्यांना माहीत होते. विशेष म्हणजे या कार्यालयाचा आणि सामान्य लोकांचा विशेष संपर्क नाही. के.टी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचेच कर्मचारी आणि त्याच्याशी संलग्न लोक या ठिकाणी येतात. एखाद्या माहितीगारानेच ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे, तर आमच्या कर्मचाऱ्यांवर आमचा विश्वास असून ते कुठल्याही चौकशीला सामोरे जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले. राजेश गर्ग या कंपनीचे संचालक असून गोविंद अग्रवाल कंपनीचे काम पाहतात. दर आठवड्याच्या शनिवारी बँका बंद असल्यामुळे ही रक्कम कार्यालयात जमा होते. चोरीला गेलेले ११ लाख ७७ हजार रुपये आणि फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत टोलनाक्यावर जमा झाले होते, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. 

प्रतिष्ठित नागरिकांची वसाहत
बन्सीलाल नगरातील गोविंदनगरात प्रतिष्ठित नागरिक राहतात. ज्या गल्लीत चोरी झाली त्या भागात नगरसेवक गजानन बारवाल, लीला सन्स कंंपनीचे मालक, मधुकरअण्णा मुळे, गोविंद अग्रवाल, तरविंदरसिंग धिल्लन आदींची घरे आहेत. हा भाग रेल्वे स्टेशनला लागून असल्यामुळे येथे हॉटेल, लॉजची संख्या अधिक अाहे. येथे पोलिसांची नेहमी गस्त सुरू असते. तरीही हा प्रकार झाला. 

पोलिसांना मोठे आव्हान
गेल्या काही दिवसांत शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर अनुपम टाकळकर यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली. सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळसूत्र चोरी तर जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारपेक्षा अधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. काही महिन्यांपूर्वी जालना रोडवर मुथ्थुट फायनान्स येथे दरोड्याचा प्रयत्न झाला होता. ते आरोपी अद्याप मोकाट आहेत. 
 
छतावरून आले, तीन दरवाजे तोडून चोरी 
चोरी झालेल्या इमारतींच्या बाजूला एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी बांबूंचा पालक (तात्पुरती शिडी) बांधण्यात आला आहे. त्याचाच आधार घेत चोरटे तिसऱ्या मजल्यावर चढले. छताचा दरवाजा तोडला, त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर आले. तेथील दरवाजा तोडला, त्यानंतर कॅशियरच्या खोलीचा दरवाजा तोडून लाेखंडी कपाटातून पैशाची बॅग पळवली. रविवारी मध्यरात्री घटना घडली तेव्हा इमारतीच्या समोरच्या बाजूला सुरक्षा रक्षक उपस्थित होता. 
 
पुढील स्लाइडवर वाचा... 
- अंधारामुळे बरेवाइट झाले तर महावितरणच जबाबदार, मनपा आयुक्तांचे महावितरणला पत्र
- घटनेचा संपूर्ण घटनाक्रम..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...