आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएमवरचीही गर्दी अोसरली, काही दिवसांतच परिस्थिती पूर्वपदावर येण्याचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरवासीयांची विस्कटलेली आर्थिक घडी आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नोटाबंदीच्या अकराव्या दिवशी म्हणजे रविवारी सुमारे दीडशे एटीएम सुरू होतील, अशी अपेक्षा असतानाच बँकांनी निम्म्या एटीएममध्ये रोकड भरल्याने लोकांच्या खिशात बऱ्यापैकी पैसे आले आहेत. काही बँकांचे एटीएम अपग्रेड झाल्याने दोन हजारांच्या नोटाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एटीएमवरील गर्दी बऱ्यापैकी ओसरल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शहरातील एस.बी.आय.चे एटीएम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे लोकांना आवश्यक रक्कम उपलब्ध होत आहे. सोमवारी आणखी काही बँकांचे एटीएम सुरू होणार असल्याने काही दिवसांतच परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी अाशा एका बँक अधिकाऱ्याने व्यक्त केली.
शहरात जवळपास ७०० एटीएम आहेत. यात एकट्या एस.बी.आय. चे ११० आणि एस.बी.एच.चे ६० एटीएम आहेत. रविवारी एस.बी.आय.चे ९० एटीएम दिवसभरात सुरू झाले होते. यामध्ये आवश्यकतेनुसार रोकड भरण्यात आली. एटीएमच्या अपग्रेडिंगचे कामही गतीने केले जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व एटीएम सुरू होतील, असे एस.बी.आय.चे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील शिंदे यांनी सांगितले.

एस.बी.एच. चे ५० एटीएम रविवारी सुरू होते. मात्र संध्याकाळी कॅश संपल्यामुळे ते बंद करावे लागले. बँक ऑफ महाराष्ट्रचे औरंगाबाद आणि जालना येथे ७२ एटीएम आहेत. पैकी शहरात २० एटीएम आहेत. रविवारी हे सर्व एटीएम सुरू होते. एच.डी.एफ.सी., अॅक्सिस, आय.डी.बी.आय.,सेंट्रल बँक ऑफ इंडियासह इतर बँकांचे एटीएमही सुरू होते. त्यामुळे एटीएमसमोरील रांगांमध्ये घट झाली.

सीडीएमसमोरील गर्दीही घटली
गेल्या काही दिवसांत सीडीएमसमोरही पैसे भरण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. मात्र गेल्या दोन दिवसांत सीडीएमवरच्या रांगा कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे एक्स्चेंज काउंटरवर नागरिकांच्या बोटाला शाई लावली जात असल्याने काउंटरवरची गर्दी कमी झाली आहे. शिवाय आता फक्त दोन हजारांपर्यंतच नोटा बदलून मिळत असल्यामुळे गर्दी आणखी कमी झाली आहे.

उद्या आणखी एटीएम सुरू होणार
रविवारी शहरातील दोनशेवर एटीएम सुरू होते. त्यामुळे फारशी गर्दी दिसून आली नाही. येत्या काही दिवसांतच गर्दीचे चित्र निवळल्याचे पाहायला मिळेल. लोकांना फार काळ वाट पाहण्याची गरज पडणार नाही. रवीधामणगावकर, उपमहासचिव, एस.बी.एच.स्टाफ असोसिएशन

पाचशेच्या नोटांनंतर गर्दी होईल कमी
दोन दिवसांपासून बँकांवरील गर्दीचा ताण कमी होत आहे. शहरातील सर्व बँकांचे एटीएम सुरू झाल्यानंतर गर्दी आणखी कमी होईल. मुंबईत ५०० रुपयांची नोट उपलब्ध झाली आहे. औरंगाबादेत ती तीन-चार दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एटीएमवरचा ताण खूप कमी होईल. आर.डी. सोनजे, उपविभागीय व्यवस्थापक, महाबँक

एटीएमवर हजारांच्या नोटा
काही बँकांचे एटीएम अपग्रेड झाल्यामुळे नागरिकांना शुक्रवारपासूनच दोन हजारांच्या नोटा मिळत आहेत. सध्या दोन हजार आणि शंभर रुपयांच्याच नोटा एटीएमवर मिळत आहेत. येत्या काही दिवसांत पाचशेची नवीन नोटही चलनात येणार असून तीदेखील एटीएमवर उपलब्ध होईल, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...