आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावतीला विरोध म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा - अभिनेते सचिन खेडेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  आंतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवातील चित्रपटांची रसिकांना चटक लागली पाहिजे, असे मत प्रख्यात अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले. यासाठी महाेत्सवाच्या अायाेजन समितीने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. 
 
प्रोझोनच्या आयनॉक्समध्ये शुक्रवारी चौथ्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नाथ ग्रुपचे नंदकिशोर कागलीवाल, प्रोझोनचे मोहंमद अर्शद, औरंगाबाद महोत्सवाचे समन्वयक डॉ. उल्हास गवळी, परिवर्तनचे अध्यक्ष नाटककार-लेखक प्रा. अजित दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
खेडेकर म्हणाले, फक्त विनोद किंवा प्रेम म्हणजे करमणुकीची व्याख्या नाही. करमणूक विविधांगी आहे याची प्रेक्षकांना जाणीव करून देण्याचे माध्यम आंतरराष्ट्रीय चित्रपट आहेत. 
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, जगभरातील सिनेमा सातत्याने बदलतो आहे. सामाजिक, राजकीय बदलांचा परिणाम चित्रपटांवर दिसून येतो.
 
डॉ. भापकर म्हणाले, चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने नवी क्रांती होत आहे. या क्रांतीची ऊर्जा नव्या पिढींना घडवेल अन् समृद्ध करेल. डॉ. गवळी म्हणाले, जगभराचे दर्शन घडवणे, त्याविषयी चिंतन करणे अाणि आपल्या विचारांना समृद्ध करण्याचे श्रेय महोत्सवाला आहे. 
 
फ्रान्स, तुर्की, पोलंडमधील चित्रपट पाहण्याची संधी पुढील तीन दिवसांत रसिकांना लाभणार आहे. याप्रसंगी श्रद्धा जोशीने ‘तेजोमय नादब्रह्म’ हे या गाणे गायले. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर ‘रऊफ’ या तुर्की चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. 
 
चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने नवकलावंतांना व्यासपीठ मिळावे म्हणून शॉर्ट फिल्म स्पर्धा घेण्यात आली. मुंबईच्या सूरज खरात यांना ‘पुसलेला नंबर’ या फिल्मसाठी तृतीय, योगिसिंग ठाकूर यांना ‘संतुलन’साठी द्वितीय आणि किरण चव्हाण यांना ‘याकूब’साठी प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. 
दरम्यान, पत्रकार परिषदेत डाॅ. पटेल म्हणाले की, संजय लिला भन्साळीच्या पद‌्मावती चित्रपटाला सुरू असलेला विराेध दुर्देवी अाहे. हा विराेध म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय आपण त्यावर निषेध कसा करू शकतो.

खेडेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय चित्रपटांमुळे मराठीला भीती नाही. परिघाबाहेर चित्रपट प्रेक्षक घडवणारे आहेत. दादा कोंडकेंनी द्विअर्थी संवादाचे चित्रपट केले. पण त्याचाही प्रेक्षकवर्ग आहे. हे चांगले ते वाईट असे विभाग करणे योग्य नाही. कारण प्रत्येक चित्रकृती त्या-त्या काळात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, साहित्यिक आणि वैचारिक जडणघडणीचे प्रतिबिंब असते. 
बातम्या आणखी आहेत...