आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यानंतरही एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेवरून पडदा उठेना, व्यवस्थापक नेमण्याची घोषणा हवेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिने नाट्यकलावंत सुमीत राघवनने संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेला वाचा फोडून महिना उलटला तरी याच्या दुरुस्तीसाठी फार हालचाली झालेल्या नाहीत. रंगमंदिराला पूर्णवेळ व्यवस्थापक देण्याचे तसेच १५ आॅगस्टपासून रंगमंदिर दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचे अाश्वासन हवेतच विरले आहे. दरम्यान, महिनाभरानंतर किरकोळ दुरुस्तीसाठी टेंडर काढण्यात आले आहे. रंगमंदिराचे रुपडे पालटण्यासाठी आता सर्वांचे लक्ष डीपीडीसीच्या बैठकीकडे लागले आहे. मात्र, या प्रक्रियेत किमान 4 ते 5 महिने जाणार आहेत. 
 
6 आॅगस्ट रोजी सुमीत राघवनने एकनाथ रंगमंंदिराचा पोस्टमार्टम करणारा व्हिडिओ फेसबुक लाइव्ह वरून जगभरात पोहोचवला होता. यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरले. ही माहिती मातोश्रीवर पोहोचल्याने याच्या दुसऱ्याच दिवशी 7 ऑगस्ट रोजी आमदार संजय शिरसाट यांनी रंगमंदिराला भेट देऊन आमदार निधीतून २० लाख रुपये देण्याची घोषणा केली. 

तर 8 ऑगस्ट रोजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांंच्याशी बोलणी करून डीपीडीसीतून नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. डीपीडीसीतून निधी मिळण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने शॉर्ट टेंडर काढून किरकोळ दुरुस्त्या करण्याचे आश्वासन आयुक्त दीपक मुगळीकर यांनी दिले होते. यासाठी १५ ऑगस्टपासून किमान महिनाभर रंगमंदिर बंंद ठेवण्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन शहर अभियंता सिकंदर अली यांनी रंग मंदिरासाठी पूर्णवेळ व्यवस्थापक देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात, महिना उलटल्यानंतरही यापैकी एकही घोषणा, आश्वासन प्रत्यक्षात उतरलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्र्यांनी डीपीडीसीतून निधी मिळवून देण्याची घोषणा केल्यामुळे आता मनपाचा यात काही सहभाग उरत नाही. येत्या डीपीडीसी बैठकीत थेट हा विषय येऊन 2 कोटींचा निधी मंजूर होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे आता सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. 
 
तक्रारींची मालिका 
एकनाथरंग मंदिराबाबत सुमीत राघवन याच्या आधीही अनेक कलाकारांनी तक्रारी केल्या आहेत. १६ जुलै २०१६ राेजी स्ट्रॉबेरी नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेल्या त्रासाबाबत कलावंत सुयश टिळक याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. २१ जुलै रोजी प्रशांत दामले यांनी रंगमंदिरात झाडू मारून येथील दुरवस्थेचा निषेध नोंदवला होता. डॉ. गिरीश ओक आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगमंदिरातील ध्वनी व्यवस्थेचे प्रेक्षकांसमोर वाभाडे काढले होते. चिन्मय मांडलेकर यानेही नाट्यगृहाच्या दुरवस्थेला नाराजी वर्तवली होती. जुलै २०१५ पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जय हरी विठ्ठल कार्यक्रमात रंगमंदिराच्या छतातून पावसाच्या धारा लागल्या होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...