आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काचा लढा : समृद्धीसाठी एकरी 40 लाख रुपये दिले तरच जमिनी देऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर  - राज्य सरकारने नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनासाठी तालुक्यात गावनिहाय वेगवेगळे दुजाभाव निर्माण करणारे  दरपत्रक जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यात संतापाची लाट पसरली आहे. एकरी  ४० लाख रुपये भावाने मोबदला अदा न केल्यास इंचभर शेतजमिनीचे संपादन करू देणार नसल्याची आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. गुरुवारपासून  तहसील कार्यालयासमोर तीन गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
 
समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील शेजारच्या  इतर गावांना शासन स्तरावरून मोठ्या रकमेचे दर जाहीर करून जांबरगाव, आगरसायगाव, कनकसागज येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची भूमिका घेतली आहे. महामार्गासाठी शासनाने शेतकऱ्यांची जमीन संपादनासाठी सुरुवातीपासून मोजणी, संपादनासाठी नोटिसा या प्रक्रिया कायदेशीर निकषात केलेल्या नाहीत असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यावर प्रसंगी  पोलिस बळाचा वापर करून जमिनी ताब्यात घेण्याची दांडगाई करण्याची तयारी सुरू आहे. मात्र आमचा प्राण गेला तरी भूसंपादनासाठी जमिनीचा ताबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका उपोषणार्थी शेतकऱ्यांनी तहसीलदार सुमन मोरे यांच्याशी बोलताना जाहीर केली. दरम्यान समृद्धी महामार्ग विरोधी कृती समितीचे सुभाष लोमटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन योग्य दराने सरकार जमीन खरेदी करत नसल्यास भूसंपादनासाठी जमीन देऊ नका, असे शेतकऱ्यांना करताना सांगितले.   
 
सामूहिक आत्मदहनाचा इशारा :  खासगी वाटाघाटीतून २८ ते ३५ लाख रुपये प्रतिएकरी भाव देण्याचे आश्वासन  अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र राज्य सरकारने   जाहीर केलेल्या दरपत्रकात तीन गावांतील जमीन संपादनासाठी अत्यल्प दर दिला.      बळजबरीने जमिनीचे भूसंपादन केल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...