आैरंगाबाद - संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे गेट आता कायमस्वरूपी बंदच राहणार असून रेल्वेचे सुरक्षा आयुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचा आदरच राखला जाईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी जाहीर केले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी येथे डिसेंबरपर्यंत भुयारी मार्ग कार्यान्वित केले जाईल. भुयारी मार्गाची निविदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मुंबई-मनमाड राजाराणी एक्सप्रेसचा औरंगाबादपर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी रेल्वेच्या मुख्य व्यवस्थपाकांसमवेत विविध प्रश्नांवर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत संग्रामनगर रेल्वे पुलावर प्रामुख्याने चर्चा झाली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भुयारी मार्ग करावा आणि तो होईपर्यंत रेल्वे फाटक सुरू ठेवावे, अशी मागणी परिसरातील श्रीमंत गोर्डे इतरांनी खा. खैरे यांच्या माध्यमातून केली होती. रेल्वे आणि एमएसआरडीसीच्या कात्रीत भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. दोन्ही विभाग एकमेकांकडे निधीसाठी बोट दाखवत आहे. २०१६ मध्येच एमएसआरडीसी निधी उपलब्ध करून देईल, असे सांगण्यात आले होते. परंतु नंतर पुलासाठीची अतिरिक्त रक्कम रेल्वेकडे असल्याचे
सांगण्यात आले. खंडपीठानेही भुयारी मार्गासाठी निधी देण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीत निधीसंबंधी रेल्वे आणि एमएसआरडीसी निर्णय घेईल आणि रेल्वे भुयारी मार्गाचे काम करेल असे स्पष्ट करण्यात आले. रेल्वेने भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून नोव्हेंबरमध्ये अंतिम रूप दिले जाईल.
मनपाचा निधी रोखणार- खा. खैरे
रेल्वेस्टेशन आैद्योगिक वसाहतीतील उड्डाणपुलासाठी मनपा, एमआयडीसी यांनी २३ कोटी द्यावे अशी मागणी खा. खैरे यांनी केली. यातील ४६ लाखांचा धनादेश रेल्वेस द्या, असे खैरे म्हणताच शहर अभियंता पानझडे यांनी सर्वसाधारण सभेची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. २५ वर्षांपासून मनपा बैठकीत हो म्हणते आणि नंतर रक्कम देत नाही. छावणीचा रस्ता, समांतर, भूमिगत गटार सर्व काही केंद्राच्या निधीतून झाले. उड्डाणपुलासाठी निधी दिल्यास केंद्राचाही निधी रोखू, असा दमच खा. खैरेंनी भरला.
घोटकरमुळे शहराला हजार कोटींचा फटका : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता यशवंत घोटणकर यांनी विभागीय आयुक्तांकडे बैठक असल्याचे सांगून या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे खैरे संतापले. घोटकरांमुळे जालना रोड बीड बायपाससाठी आलेला हजार कोटींचा निधी परत चालला. तो परत गेला तर त्याचे खापर भाजपवर फुटेल, असे खैरे म्हणाले.
पिटलाइनमुळे चार नवीन रेल्वेंचा मार्ग मोकळा
चिकलठाणायेथे पिटलाइन सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे अडीच वर्षांत आैरंगाबादहून किमान चार नवीन रेल्वे सुरू करणे शक्य होईल. पिटलाइनसाठी पुरेशी जागा चिकलठाणा स्थानकावर असून त्यासाठी ११ कोटींची तरतूद केली आहे. रेल्वे बोर्ड पिटलाइनच्या प्रस्तावास हिरवी झेंडी दाखवेल अशा पद्धतीने प्रयत्न सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले.
एमटीडीसीमुळे अडले मॉडेल स्टेशन
आैरंगाबादस्थानकास मॉडेल स्टेशनचा दर्जा दिल्यानंतर पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्याची घोषणा झाली. मॉडेल स्थानकाचा नकाशाही प्रसिद्ध झाला. वर्षांपासून हे काम प्रलंबित या टप्प्यासाठी पर्यटन विभाग रेल्वे प्रत्येकी ५० टक्के खर्च करेल. पर्यटन विभागाच्या निधीअभावी काम रखडले. त्यांच्याशी संपर्क करू, एवढेच यादव म्हणाले.
छावणी उड्डाणपुलासाठी २० कोटी
आैरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील छावणी उड्डाणपुलाचे एका बाजूचे काम पूर्ण झाले. रस्ता रुंदीकरणानंतर आता केवळ उड्डाणपुलाचे रुंदीकरण बाकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा यांनी सांगितले. लासूर स्टेशन रेल्वे उड्डाणपूल राज्य रेल्वेच्या सामाईक निधीतून करण्याचा प्रस्ताव दिला आहे. शिवाजीनगर येथेही भागीदारीतून उड्डाणपूल होईल.
विशेष रेल्वेसाठी वर्मांचा प्रस्ताव
मुकुंदवाडीस्थानकावर जनशताब्दी आणि तपोवनला थांबा द्यावा. नांदेड- बिकानेर रेल्वे मनमाड, ठाणे, वसई विरारमार्गे सुरू करावी. म्हैसूर महोत्सवासाठी २०१८ मध्ये रेल्वे सोडावी, अशी मागणी ओमप्रकाश वर्मा यांनी केली. लासूर रोटेगाव स्थानकावर नरसापूर - नगरसोल रेल्वेला थांबा देण्याची मागणी राजकुमार सोमाणी यांनी केली. आैरंगाबाद-मनमाडदरम्यान तास पॅसेंजर रेल्वे नसल्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.