आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेसाठी पुढाकाराने पालिकेचे 6 लाख वाचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना शहरातील विविध भागांत स्वच्छता करण्यात आली. - Divya Marathi
जालना शहरातील विविध भागांत स्वच्छता करण्यात आली.
जालना - विविध विभागांच्या थकबाकीमुळे नगर पालिकेवर मोठ्या प्रमाणात  कर्ज आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ जुळवताना पालिका प्रशासनाची मोठी कोंडी होते. त्याचा परिणाम शहरात सुविधा देताना दिसून येतो. या अडचणींवर मात करण्यासाठी जालना नगरपालिकेत प्रथमच कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून आठवडाभर शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व तब्बल नऊशे टन कचरा उचलण्यात आला असून लोकसहभागामुळे पालिकेचे सहा लाख रुपये वाचल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 
 
नगर परिषदेच्या वतीने काही दिवस अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवून रस्ते मोकळे करण्यात आले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी फुटली होती. मात्र, काही दिवसांतच रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाल्यांच्या गाड्या पूर्ववत झाल्याने वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच सुरू झाली आहे. दरम्यान, शहरातील अस्वच्छता ही समस्या पाचवीलाच पुजलेली आहे. शहराच्या कुठल्याही भागात गेल्यास दुर्गंधी पाहावयास मिळत आहे. मुळात पालिकेकडे येणारा आर्थिक स्रोत कमी असल्यामुळे नगरपालिका भौतिक सुविधा देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी शहर अंधारात आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात हायटेक स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पालिकेकडे पाहिजे तसे मनुष्यबळ, मशिनरी नसल्यामुळे शहरात घाण ही नित्याचीच झाली आहे. शहरात स्वच्छता राहण्यासाठी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पुढाकार घेऊन शहरात सात दिवस लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेसाठी पालिकेतील बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षणाधिकारी यांनी स्वखर्चातून ट्रॅक्टर, डिझेलसाठी रक्कम दिली. यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबविणे सोयीस्कर झाले. अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत   ९०० टन कचरा बाहेर काढला. या स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने नगराध्यक्षा, नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संघटन झाले. पुढील मोहीमही एकत्रित प्रयत्नाने  राबवून  विकासासाठी पुढाकार घेणार असल्याचे नगरसेवकांकडून सांगितले.
 
सर्वांचा पुढाकार   
- लोक सहभागातून कुठल्याही समस्येवर मात करता येते. अशा उपक्रमात प्रत्येकाने सहभाग घेतल्यास पालिकेचा स्तर उंचावण्यास वेळ लागणार नाही. आगामी काळातही असेच उपक्रम राबवणार आहोत.  
संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, न. प. जालना.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...