आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड्यामुखी वेद वदवून घेण्याच्या घटनेस ७३० वर्षे पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पैठण येथील प्राचीन नागघाटावर शके १२०९ तथा इ. स. १२८७ ला संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या १२ व्या वर्षी रेड्यामुखी वेद वदवून  घेण्याच्या  घटनेला बुधवारी (दि. १) ७३० वर्षे पूर्ण झाली आहेत.

संत ज्ञानेश्वरांनी याच दिवशी रेड्यामुखी वेद वदवून आपले बंधू निवृत्तिनाथ, सोपान, बहीण मुक्ताबाई यांच्या  मौंजीसाठी शुद्धिपत्र मिळवले. या घटनेला बुधवार, १ फेब्रुवारी रोजी माघ शुद्ध वसंत पंचमीला ७३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच ठिकाणी भाविकांनी रेड्याच्या मूर्तीचा महाभिषेक पुरोहित सुयश शिवपुरी आणि सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चारात ज्योती जेठे, सपना शिंदे व रेणुका शाहू यांच्या हस्ते झाला.  या वेळी विष्णू महाराज जगताप, गीता मंदिर वारकरी संस्थेच्या बालगोपाळांच्या भावगीते व भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. याप्रसंगी भक्तांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेवर व  रेड्याच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली.  या वेळी बंडेराव जोशी यांनी ज्ञानेश्वरीच्या ३०० ओव्या म्हटल्या. दिनेश पारीख यांचे या वेळी भाषण झाले. 

कार्यक्रम यशस्वितेसाठी समीर धर्माधिकारी, रमेश पाठक, शिवाजी तुपे, रमेश खांडेकर, योगेश साबळे, बाळनाथ मोहिनी, अनिल सराफ, मिलिंद नाईक, जगन्नाथ जमादार, सुनील गोसावी, गोकुळ वरकड, सतीश सराफ, राजेंद्र पाठक, संतोष छडीदार, रवींद्र पांडव, केदार लाहोटी, विष्णू ढवळे, ईश्वर मोरे, गणेश जुंजे, नवनाथ वडेकर, भाऊसाहेब पठाडे, एकनाथ चांदणे, रवींद्र वानखेडे, राजेंद्र बडसल, लक्ष्मीकांत पसारे, शरद बीडकर, गोविंद शिंदे,  प्रसाद ख्रिस्ती, गणेश बोबडे, रतीलाल नागोरी आदींनी परिश्रम घेतले. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

नागघाटाला मिळावा स्मारकाचा दर्जा 
पैठण येथील संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले. त्या नागघाट स्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून शासनाने जाहीर करावे तसेच नाग घाटाला प्रवेश गेट बसवावे, अशी मागणी या वेळी भाविकांनी केली.

अशी आहे आख्यायिका  
मुलांच्या मुंजी व्हाव्यात म्हणून आई रुक्मिणी व वडील विठ्ठलपंतांनी देहान्त प्रायश्चित्त घेतले. तद्नंतर काही दिवसांनी संत ज्ञानेश्वर भावंडांसह दक्षिण काशी  पैठणच्या धर्म न्यायपीठाकडे मुंजीची परवानगी द्यावी, या विनंतीसाठी आले. त्यावर निर्णय देण्यासाठी सभा बोलावली गेली. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या मुलांना मुंजीची परवानगी देण्याची धर्म घटनेत तरतूद नाही, त्यामुळे अशी परवानगी नाही, अशा निर्णयावर धर्मपीठ ठाम होते. त्यावर  धर्माचार्य म्हणाले, ऋग्वेद बोलवा. माउलींनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून ऋग्वेद बोला, असा आदेश दिला आणि रेडा ऋग्वेदातील ऋचा बोलू लागला.  धर्माचार्यांसह उपस्थितांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जयजयकार केला. ज्ञानेश्वर,  निवृत्तिनाथ, सोपान, मुक्ताई ही भावंडे देव अवतार असल्याची प्रचिती उपस्थितांना आली.