आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहलीदरम्यान अपघातास शिक्षकच जबाबदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षण विभागाने शालेय सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रकच जारी केले आहे. त्याचे पालन करणे प्रत्येक शाळेला बंधनकारक राहणार असून विद्यार्थ्यांची हेळसांड झाल्यास, काही अपघात झाल्यास किंवा विद्यार्थ्यांना शारीरिक वा मानसिक त्रास झाल्याची तक्रार पालकांनी केली तर त्यास शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.
परिपत्रकानुसार समुद्रकिनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत. सहलीपूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांनी सहलीबाबत तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे. सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी वा ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये आणि डॉक्‍टरांचे संपर्क क्रमांक बरोबर असावेत. सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोहोचवावा. त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी. गरज भासल्यास सहलीबरोबर पालकांचा एक प्रतिनिधी पाठवावा.

असे घातले नियम अटी : सहलीपूर्वीविद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घेणे बंधनकारक आहे. सहलीच्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन शाळांनी विद्यार्थ्यांना केले पाहिजे. सहलींसाठी एसटी किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या बस वापराव्यात. दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक सहलीबरोबर पाठवावा. विद्यार्थिनींना एकटे वा नजरेआड फिरण्यास सोडू नये. शिक्षकांनी तंबाखू, गुटखा आणि अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये. विद्यार्थ्यांना मोबाइल फोन वापरण्याची तसेच त्यांना पालकांच्या संपर्कात राहण्याची मुभा सूचना द्यावी. माध्यमिक विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, जलक्रीडा इत्यादीसाठी परवानगी देऊ नये. विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती कोणत्याही संस्थेने करू नये. शैक्षणिक सहलीसाठी जादा वर्गणी वा जादा शुल्क गोळा करू नये. शैक्षणिक सहलीच्या मुक्कामाचा कालावधी हा एका मुक्कामापेक्षा अधिक असू नये.

लेखी परवानगी घ्या : प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहली काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. सहलीच्या सर्व बाबी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळवाव्यात. प्राथमिक शाळेच्या सहली या परिसर भेट वा संध्याकाळी परत घरी येतील अशा असाव्यात. रात्रीच्या वेळी प्रवास करू नये. साहसी खेळ, वॉटर पार्क, अॅडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढू नयेत. रेल्वे फाटक नसलेल्या ठिकाणी रेल्वेगाडी पुढे गेल्याची खात्री वा गाडी येत नसल्याची खात्री करूनच बस पुढे न्यावी.

राज्याबाहेर सहल काढण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी मिळणार नाही. सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक आणि सहलीतील सर्व शिक्षकांची असेल. सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल, तर एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर नेणे बंधनकारक राहील. विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घ्यावी. सहलीत विद्यार्थी, शिक्षक, शाळेने निश्चित केलेला पालक प्रतिनिधी याशिवाय बाहेरची व्यक्त घेऊ नये.

शंभर रुपयांचे स्टॅम्प
शाळांनीया सर्व सूचनांचे पालन केले आहे का याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी तसेच त्यासंबंधी शंभर रुपयांच्या स्टँपवर हमीपत्र घेऊनच सहलींसाठी परवानगी द्यावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...