आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील शिल्परसिकांना सुनील देवरेंच्या शिल्पांची मोहिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील सुनील देवरे या शिल्पकाराने त्याच्या अप्रतिम शिल्पांनी अमेरिकेतील शिल्पप्रेमींना अक्षरश: मोहिनी घातली आहे. मे महिन्यात एक महिन्यासाठी सुनील देवरेंच्या शिल्पांचे प्रदर्शन अमेरिकेतील विविध शहरांत भरवण्यात आले होते. तत्पूर्वी, जुलै महिन्यात फ्रान्सच्या शिल्परसिकांनादेखील देवरेंची शिल्पकला पाहण्याचा योग आला होता. अमेरिकेतील शिल्परसिकांच्या आग्रहास्तव ३५ आर्ट गॅलरींनी सुनीलसोबत करार केले आहेत. १८ वर्षांपासूनच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे देवरे यांनी सांगितले.
औरंगाबाद शहराला वेरूळ-अजिंठा लेणींसारखा वारसा लाभलेला आहे. हे शहर ऐतिहासिक शहर म्हणून सबंध जगात ओळखले जाते. याच शहरातील एक शिल्पकार त्याच्या कलेतून, मनाच्या कल्पनेतून अतिशय आकर्षक मूर्ती तयार करतो आणि देशासह जगाला भुरळ पाडतो, हे त्याच्या कलेचे वैशिष्ट्य.
१९८९ ते १९९५ सालापर्यंत जे.जे. आर्ट ऑफ स्कूलमधून शिल्पकलेचे शिक्षण घेतलेले सुनील देवरे त्यांच्या मनातील कल्पना हुबेहूब शिल्पात उतरवतात आणि त्यामध्ये नावीन्यदेखील जपतात, हे त्यांचे कौशल्य. आजपर्यंत देशातील १७ ठिकाणी त्यांच्या कलेचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यासोबतच देशाबाहेरही अनेक ठिकाणी त्यांच्या या कलेचे कौतुक होत आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, वॉशिंग्टन डीसी, मॅनहटन आणि इतर आर्ट गॅलरींसोबत सुनील यांनी करार केले आहेत. या आर्ट गॅलरींमध्ये दहा वर्षे त्यांच्या शिल्पांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रसिद्ध अशा गिलबर्ड आर्ट गॅलरी, जे.एस. आर्ट गॅलरी, एम.ओ.जे. आर्ट गॅलरी, हस्टन आर्ट गॅलरी यांचा समावेश आहे.
विशेष करून सुनील देवरे यांची पिकॉक फॉर्म, बोटमॅन (नावाडी), स्वँड ड्रीमिंग इन टू लेडी, ई-बूल, गणेश पिरॅमिड ही विशेष नावाजलेली शिल्पे. यासोबतच त्यांच्याकडे आणखी १०० शिल्पांचा संग्रहदेखील आहे. भविष्यात यामध्ये आणखी भर पडेल, असा विश्वास सुनील देवरे यांनी व्यक्त केला.

लोकांची दाद मिळणे हेच मोठे यश
- आपल्या कल्पकतेला लोकांनी दाद देणे हे यश मी मानतो. वेरूळ-अजिंठाच्या सान्निध्यात शिल्पकला करतोय त्याचा आनंद घेतोय, याव्यतिरिक्त एका कलावंताला काय पाहिजे...!!!
सुनील देवरे, शिल्पकार
शिल्प आणि भित्तिचित्रावर काम सुरू
सध्या देवरे यांचे जालना शहरात ब्राँझ धातूपासून गौतम बुद्धांचे २५ फुटांचे शिल्प उभारण्याचे तसेच पुणे महानगरपालिकेत शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंगांचे भित्तिचित्र ब्राँझ धातूपासून करण्याचे काम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...