आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादः सुरक्षा रक्षकाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून दरोड्याचा प्रयत्न, ATM फुटले नाही, केली तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोंढा नाक्यावरील एका बड्या ज्वेलर्सच्या दालनावर बुधवारी रात्री दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. दालनाच्या रक्षणासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकावर कारमधून आलेल्या काही तरुणांनी त्याच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने सुरक्षा रक्षक मोठ्याने ओरडला आणि मागे पळत जाऊन स्वत:चा बचाव केला. त्याचा आवाज ऐकून दरोडेखोरही पळून गेले. मंगळवारी मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. जिन्सी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 
 
जालना रस्त्यावरील वाहतूक शाखेचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या दर्शनी गाळ्यामध्ये एका बड्या प्रसिद्ध कंपनीचे ज्वेलर्सचे दालन आहे. मंगळवारी रात्री दालनाचे सुरक्षा रक्षक गोविंद दत्ताराव इंगोले आणि त्यांचा एक साथीदार (२४, रा. जयभवानीनगर) ड्यूटीवर होते. २.३० ते २.४५ वाजेच्या दरम्यान मोंढा नाका पुलावरून सिडकाे बसस्थानकाच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची कार जात होती. 
 
पूल उतरताच त्यांनी मोंढ्याच्या दिशेने कार फिरवून दालनासमोर उभी केली. काहींनी कारच्या काचा खाली करून सुरक्षा रक्षक गोविंदला एका हाॅटेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करत जवळ बोलावले. गोविंद कारजवळ जाऊन त्यांना पत्ता समजावून सांगत असतानाच कारमधील एकाने त्यांच्या तोंडावर स्प्रे फवारला. स्प्रेचा फवारा उडताच गोविंदला संशय आला आणि तो ओरडत दालनाच्या दिशेने पळाला. गोविंदसोबत त्याचा साथीदार असल्याचे कळताच दरोडेखोर सावध झाले आणि त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गोविंदच्या डोळ्यांवर स्प्रे मारल्यामुळे त्याला थोड्या वेळासाठी काहीच कळले नाही. त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने सुरक्षा रक्षकाने ही माहिती आधी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवली. त्यानंतर जिन्सी पोलिसांना घडलेला प्रकार सांगण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गोविंदच्या दोन्ही डोळ्यांमध्ये स्प्रे गेल्याने त्यांना त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर यांनी बुधवारी दुपारी सुरक्षा रक्षकांची चौकशी करून सीसीटीव्हीतील चित्रणाची पाहणी केली. 
 
घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद 
दालनाभोवती सीसीटीव्ही आहेत. हा प्रकार सीसीटीव्हीच्या क्षेत्रात घडल्यामुळे कार आणि क्रमांक यामध्ये कैद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याआधारे दरोडेखाेरांचा शोध घेणे सोपे झाले आहे, असा दावा पोलिसांनी व्यक्त केला आहे. जालना रोडवरील बहुतांश दुकानांवर सीसीटीव्ही बसवलेल्या आहेत. त्यांचेही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. 
 
एटीएम फुटले नाही, म्हणून केली तोडफोड 
पिसादेवी रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. तोंडाला कापड बांधलेल्या चोरांनी एटीएममध्ये प्रवेश करताच सीसीटीव्हीचे वायर तोडले. बराच वेळ प्रयत्न करूनही त्याना एटीएम मशीन फोडता आले नाही. त्यामुळे तोडफोड करून दरोडेखाेर पसार झाले. बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. पिसादेवी रस्त्यावरील सनी सेंटर या इमारतीत स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. बुधवारी पहाटे दरोडेखोरांनी ते फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. पण उपयोग झाला नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...