आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार चव्हाण यांना दिला भाजपने धक्का; राष्ट्रवादीची विजयी घोडदौड पहिल्यांदा रोखली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत भाजप प्रणीत विद्यापीठ विकास मंचने पहिल्यांदा अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत उत्कर्ष पॅनलची विजयी घोडदौड रोखण्यात मंचला यश आले. विशेष म्हणजे, उच्चवर्णीयांच्या प्रतिनिधित्वाची कायम टीका होणाऱ्या भाजपने बहुतांश उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडून आणले. अविनाश येळीकर यांच्या पराभवामुळे उत्कर्षचे मार्गदर्शक आमदार सतीश चव्हाण यांना जोरदार धक्का बसला. 


विद्यापीठीय राजकारणात आतापर्यंत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व होते. अधिसभा असो की व्यवस्थापन परिषद, सर्वाधिक प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचेच होते. मागील अधिसभेत सरस्वती भुवन महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक डॉ. गजानन सानप पदवीधर मतदारसंघातून तर संजय निंबाळकर संस्थाचालकांमधून निवडून आले होते. या दोघांचा अपवाद वगळता भाजपला विद्यापीठीय राजकारणात जम बसण्यात यश आले नव्हते. या वेळी मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपची सरकार असल्यामुळे विद्यापीठीय राजकारणातील भाजप कार्यकर्त्यांनाही हुरूप आला होता. डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. सानप यांनी निवडणुकीची रणनीती आखली. आमदार चव्हाण यांना धक्का देण्याच्या उद्देशाने डॉ. सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चारही जिल्हे पिंजून काढले होते. त्याचा परिणाम म्हणून प्राचार्यांच्या मतदारसंघात दहापैकी पाच जागा जिंकून राष्ट्रवादीला डॉ. सानप यांनी जोरदार धक्का दिला. मंचचे एनटी प्रवर्गातून डॉ. रामचंद्र इप्पर यापूर्वीच बिनविरोध निवडून आले. अनुसूचित जातीमधून पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा उत्कर्षचे उमेदवार डॉ. अभिजित वाडेकर यांचा दोन मतांनी पराभव झाला. मंचच्या डॉ. कमलाकर कांबळे यांनी ४९ तर डॉ. वाडेकर यांनी ४७ मते घेतली. ओबीसी प्रवर्गातून हरिदास विधाते यांनी उत्कर्षच्या सोपान निंबोरे यांचा अवघ्या एक मताने पराभव केला. संस्थाचालकांतून संजय निंबाळकर हे पूर्वाश्रमीचे भाजपचे उमेदवार पुन्हा भाजपच्या मदतीने निवडून आल्याचे डॉ. सानप यांनी म्हटले आहे. 


डॉ.गायकवाड, येळीकरांचा पराभवाने राष्ट्रवादी व्यथित
आतापर्यंतच्याइतिहासात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेत जोरदार प्रतिनिधित्व होते. मंडळ पर्यायाने आमदार चव्हाण यांना जोरदार धक्का बसला. मंडळाचे प्रमुख पदाधिकारी असलेले अविनाश येळीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. संस्थाचालकांच्या मतदारसंघासाठी ३८ मतांचा विजयी कोटा ठरवला होता. येळीकर यांना फक्त १९ मते मिळाली. येथे अपेक्षेप्रमाणे भाऊसाहेब राजळे आणि निंबाळकर विजयी झाले. विद्यापीठीय शिक्षक मतदारसंघात डॉ. सुरेश गायकवाड यांचा पराभव झाल्यामुळेही चव्हाण यांना धक्का बसला. त्यांचा मंच पुरस्कृत डॉ. सतीश दांडगे यांनी दारुण पराभव केला. विशेष म्हणजे विद्यापीठातील सर्वसाधारण जागेवर उत्कर्षचे डॉ. राम चव्हाण आणि डॉ. स्मिता अवचार यांना जोरदार मते मिळाली, पण अनुसूचित जातीतून डॉ. गायकवाड यांना फक्त ५७ मतेच मिळवता आली. 

बातम्या आणखी आहेत...