आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ कारखाना बंद; दोन हजार हेक्टरवरील उसाचा प्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- संत एकनाथ कारखाना संचालकांच्या आपसातील मतभेदांमुळे आज बंद पडल्याने तालुक्यातील दोन हजार हेक्टरवरील उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तोडीही अचानकपणे थांबवल्याने अनेकांचा ऊस तोडून फडात पडला आहे. किमान हा ऊस तरी कारखान्याने न्यावा या मागणीसाठी गुरुवारी ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर एकच गर्दी केली होती. दरम्यान, विभागीय पोलिस अधिकारी बच्चनसिंह यांनी सचिन घायाळ शुगर्सच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली, परंतु बैठकीत साखर गेटबाहेर जाऊ देण्याचा प्रश्न प्रलंबितच राहिला. परिणामी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा संत एकनाथ कारखान्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

संत एकनाथ सहकारी साखर कारखाना १८ वर्षांसाठी सचिन घायाळ यांनी भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून कारखान्याने या दोन महिन्यांत एक लाख टनांच्या वर उसाचे गाळप केले आहे. आणखी ५० दिवस कारखाना सुरू राहिला असता. दरम्यान, कारखान्याची निवडणूक असून यात सचिन घायाळ हे आपले पॅनल उभे करणार आहेत. त्यामुळे विद्यमान एकनाथच्या संचालकांसमोरील अडचणी वाढणार असल्याने हे राजकारण तापले असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी संत एकनाथचे चेअरमन व संचालक आपल्याकडे पैशाची मागणी करत असून त्यास आपण नकार दिल्याने काही कामगारांना हाताशी धरून कारखाना बंद पाडण्याचे धोरण संत एकनाथचे संचालक करत असल्याचा आरोप घायाळ यांनी केला आहे.
कारखान्याला ऊस घालण्याकडे संचालकांचीच पाठ
कारखाना वाचला पाहिजे अशी भूमिका केवळ भाषणातून घेणाऱ्या संत एकनाथच्या सर्व संचालकांना फक्त निवडणूक लढता अाली पाहिजे. तेवढाच ऊस यंदा कारखान्याला घातला असल्याची बाब समोर येत आहे. आपण संचालक असतानाही तालुक्याबाहेरील कारखान्याला ऊस संत एकनाथच्या संचालकाने घातला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर चेअरमन सचिन घायाळ म्हणाले, संचालकांना केवळ निवडणुकीपुरताच कारखान्याचा पुळका आहे, असे यावरून दिसते.

शिल्लक ऊस आता केदारेश्वरला देणार
पैठणच्या शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आजपासूनच एकनाथला येणारा ऊस शेवगावच्या केदारेश्वर या कारखान्याला देणार आहे. संत एकनाथ कारखाना ते केदारेश्वर हे अंतर २९ किमी असून हा कारखानाही घायाळ शुगर्सनेच घेतला आहे.

शेतकरी हवालदिल
२६ जानेवारीला काही कामगारांनी व संत एकनाथचे चेअरमन आमदार संदिपान भुमरे यांनी सचिन घायाळ हे मनमानी करत असल्याचे सांगत कारखान्याच्या बाहेर साखर जाऊ देणार नाही, असे जाहीर केल्याने सचिन घायाळ यांनी कारखाना आज बंद केला. एका दिवसात हा निर्णय झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात तोडून पडलेला आहे.