(रथयात्रेप्रसंगी भालाफेकीचे प्रात्यक्षिक करताना धर्मवीर आखाड्यातील मुली. )
औरंगाबाद- छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ रोजी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक केला होता. यानिमित्त शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात रथयात्रा काढण्यात आली. रथाच्या समोर बुलडाण्याच्या धर्मवीर आखाड्यातील मुला-मुलींनी "जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषात तलवार, भाला, लाठीकाठी या शिवकालीन शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करत सर्वांचे लक्ष वेधले.
माजी आमदार एम. एम. शेख यांच्या हस्ते महात्मा फुले यांना अभिवादन करून रथयात्रा औरंगपुरा, गुलमंडी, पैठण गेट, सिल्लेखाना, नूतन कॉलनीमार्गे क्रांती चौक येथे पोहोचली. छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीसाठीचा भव्य रथ आकर्षकरीत्या सजवण्यात आला होता. आनंदोत्सव असो किंवा रणांगणाच्या वेळी मावळे ज्याप्रमाणे शस्त्रकला सादर करत होते त्याचप्रमाणे धर्मवीर आखाड्यातील मुलांनी कला सादर केली. तलवारबाजी आणि भालाफेकीच्या प्रात्यक्षिकांनी शिवकाळात गेल्याचा भास प्रत्यक्षदर्शींना झाला.
या आखाड्यात आशिष जाधव, रोहिणी गायकवाड, वैष्णवी गायकवाड, विजय उबरहंडे, अमृता जाधव, बाळू काकडे, मृत्युंजय गायकवाड आदींनी िशवकालीन वेशभूषा, अलंकार परिधान केले होते. तलवारीच्या एका घावात नारळाचे दोन तुकडे ,जमिनीवर एका रेषेत सात लिंबे ठेवून बरोबर त्याचा वेध घेत दोन भाग करून दाखवले. मुलींनी लाठीकाठी, दांडपट्टा तलवार वेगाने फिरून सर्वांना आश्चर्यचकित केले. स्वसुरक्षेत मुलीही कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या स्वरात भक्तिभावाने हरिनामाचा गजर केला. माजी आमदार कल्याण काळे यांच्या हस्ते क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आमदार सुभाष झांबड, समितीचे अध्यक्ष सय्यद अक्रम, निमंत्रक दाते पाटील, राहुल पाटील, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, शेख जावेद, शेख रऊफ, राजेश मुंडे, राजकुमार जाधव, राजेश पहाडिये, धनंजय देशमुख, अनिल सोनवणे, डॉ. विशाल पतंगे, कल्पना नेवे, बबन डिंडोरे, दर्शनसिंग मलके, आबेद हुसेन, शेख नवीद, भास्कर मोरे, भगवंत वायभसे, अश्फाक कुरेशी, मोहन साळवे आदी उपस्थित होते.
सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिले
अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. ते कोणत्याही धर्माला वाईट मानत नसत. त्यांचा लढा अन्यायाविरोधात होता. न्याय, समता, बंधुता स्थापन करण्यासाठी जशास तसे उत्तर देऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, असे मत माजी आमदार काळे, अॅड. अक्रम, सय्यद अब्बास यांनी व्यक्त केले.