औरंगाबाद - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती होण्याबाबत मला शंका आहे. युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, युती न झाल्यास रिपाइं भाजपसोबतच राहील, असे सांगतानाच निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांना एकत्र आणले जाईल आणि मुंबईचे उपमहापौरपदही आमच्या पक्षाकडे मागितले जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी शनिवारी औरंगाबादेत सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिन सोहळ्यासाठी ते शहरात आले होते. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी आणि प्रमोद माने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मुंंबईत शिवसेनेची ताकद आहेच, परंतु अलीकडच्या काळात तेथे भाजपही मजबूत झाला आहे. त्यामुळे दोघांत जागावाटप होईल, असे वाटत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली नाही तर रिपाइं भाजपसोबतच असेल. नंतर महायुतीचाच महापौर होईल. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा महापौर होईल. मात्र, रिपाइंला अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद मागितले जाईल, असेही आठवले यांनी सांगितले. भाजपसोबत मुंबई पालिकेची निवडणूक लढवणार असलो तरी कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर आम्ही लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युती झाली तर २० ते २५ आणि फक्त भाजपसोबत निवडणूक लढवली तर ४० ते ५० जागा आपल्या पक्षाला मिळण्याची आशा असल्याचे आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री रामदास आठवले गेल्या काही दिवसांपासून अधिक जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी भाजपवर दबाव वाढवत आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेत त्यांना अपेक्षित असलेल्या जागा भाजप देईल की नाही याकडे रिपाइं नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेशात रिपाइंची ताकद दाखवून देऊ
दलित मतदारांवर फक्त मायावती यांच्या बसपाचाच अधिकार नाही हे आम्ही आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध करू, असे सांगतानाच येथे आम्ही काही ठिकाणी उमेदवार देणार आहोत. जेथे उमेदवार नसेल तेथे भाजपलाच पाठिंबा असेल, असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात मायावतींनी आमच्या मतांवर अतिक्रमण केले आहे. ते या वेळी काढून टाकले जाईल. हजार-चार हजार मते मिळतील, परंतु आम्हीही उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय आहोत हे दाखवून दिले जाईल.