आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील नाराजांनी बांधली वेगळी मोट?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी अपक्ष स्मिता घोगरे यांनी उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या नव्या दमाच्या नगरसेवकांनी वेगळी मोट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्षांची मदत घेत विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गट नोंदवण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. नाराजांच्या या गटातील नगरसेवकांची संख्या सध्या १२ असून त्यात वाढ होईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. सेनेतील या नाराजीचा फायदा घेण्यासाठी अपक्ष नगरसेविका कीर्ती शिंदे सरसावल्या असून त्यांनी महापौर तसेच उपमहापौर अशा दोन्हीही पदांसाठी अर्ज ताब्यात घेतले आहे. १४ डिसेंबरपर्यंत वेगवान घडामोडी होतील. तेव्हा आपल्याकडे पर्याय असावा म्हणून त्यांनी ही तयारी चालवली आहे.
शिवसेनेकडून घोगरे यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणे निवडून आलेल्या अन् पहिल्यांदाच सभागृहात पोहोचलेल्या नगरसेवकांनी यास आक्षेप घेतला होता. त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. आता निर्णय झाला काही होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते. याच नाराजांनी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचीही भेट घेतली. तेथे तेच उत्तर समोर आले. त्यामुळे त्यांनी मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानी आपली नाराजी टाकण्याचे ठरवले होते. परंतु स्थानिक सर्वच नेते घोगरे यांच्या बाजूने असल्याने पुढे काहीही होणार नाही, असा मतप्रवाह पुढे आला. अपक्षाला उमेदवारी देण्यासाठी खैरे, शिरसाट आणि दानवे जसे एकत्र आले तसेच आपण सर्वांनी एकत्र येऊन या त्रिकुटाला जेरीस आणावे, असे या सर्वांनी ठरवले. यापुढेही सर्वांनी एकत्र राहण्याचे ठरवल्यानंतर या मंडळींनी गट स्थापन करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी युतीसोबत असलेल्या अपक्षांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी त्यांची एक बैठकही झाली. सर्वांसोबत राहत दुसऱ्याच उमेदवाराला मतदान करण्यापर्यंत त्यांचे नियोजन असल्याचे समजते. त्यामुळे कदाचित तीन उमेदवार रिंगणात येऊ शकतात. तडजोड झाली तरी उपमहापौरपदाचा उमेदवार बदलला गेला तर आपल्याकडे पर्याय असावा म्हणून शिंदे यांनी दोन्हीही पदांचे अर्ज घेऊन ठेवले. शिंदे यांनी वेळोवेळी युतीला मतदान केले आहे. गत वेळी त्यांनी शिवसेनेकडे थेट महापौरपदाची मागणी केली होती. या वेळीही त्यांनी दावा केला होता. परंतु अपक्ष असल्याने त्यांच्या नावाचा विचार होणार नसल्याचे एकीकडे सांगण्यात आले अन् दुसरीकडे सेनेने अपक्षालाच उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनीही नाराजी व्यक्त करत अर्ज ताब्यात घेऊन आपण प्रत्यक्ष कृती करू, असे संकेत दिले आहे. शिवसेनेचे १२ नगरसेवक तसेच युतीतील अपक्ष यांची मदत मिळाली तिकडे सेनेला फटका देण्यासाठी काँग्रेस एमआयएम सोबत आली तर काहीही घडू शकते, असे नाराज गटाचे म्हणणे आहेच.

स्वतंत्र गट राहणारच ?
उपमहापौरपदाच्या उमेदवारीवरून असलेली ही नाराजी निवडणुकीनंतर संपणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. भविष्यातही स्वतंत्र गट ठेवून दबावतंत्र अवलंबले जाईल, असे संकेत मिळत आहेत. सेेनेतील भांडवलशाहीला थांबवायचेच, असे या गटाचे म्हणणे आहे. त्यात त्यांना कितपत यश येते, हे या निवडणुकीत दिसून येईल किंवा ही नाराजी म्हणजे कपातील वादळ तर नाही ना, हेही स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...