आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद- खुणा केल्या, अतिक्रमण तसेच; रस्त्याचे काम सुरू, आयुक्तांचे आदेशही धाब्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सहा महिन्यांपूर्वी मोजमाप केले, रुंदीकरणास बाधा ठरणाऱ्या अतिक्रमणावर तसेच ओटे, शेड, सुरक्षा भिंती आणि घरांवर मार्किंगही केली. हे सारे अतिक्रमण काढूनच रस्त्याचे काम करावे, अशी आयुक्तांनीही कडक सूचना केली. पण नंतर त्याची अंमलबजावणी झालीच नाही. कुठलेही अतिक्रमण काढताच हिंदूराष्ट्र चौक ते रिलायन्स मॉल या रखडलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण व्हाइट टॉपिंग रस्त्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. त्यामुळे भविष्यात अडचणी कायम राहणार हे स्पष्ट आहे. 
 
या रस्त्याच्या कामाचे जानेवारी २०१७ रोजी उद्घाटन करताना नकाशाप्रमाणे रस्त्याचे मोजमाप करा, अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढा, आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण करा आणि मगच प्रत्यक्ष काम सुरू करा, अशी मागणी पुढे आली. त्या वेळी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही नगररचना विभागाकडून या रस्त्याचे आराखड्यानुसार मोजमाप करून घेतले. त्यानुसार रिलायन्स मॉल ते हिंदूराष्ट्र चौक या रस्त्याची एकूण लांबी ५०० मीटर आणि रुंदी १५ मीटर असल्याचे समोर आले होते. 
 
लाल निशाण मारले 
यानंतर हालचाली झाल्या आणि नगररचना विभागाने अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांसमोर या रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमित मालमत्तेवर लाल निशाण (मार्किंग) म्हणजेच स्पष्टपणे खुणाही करून दिल्या. मात्र, अतिक्रमण विभागाने पुढे कार्यवाही केलीच नाही. अतिक्रमण काढण्यास चालढकल केली. राजकीय हस्तक्षेप दबावाला विभाग बळी पडल्याचे स्पष्ट होते. या रोडवरील गजानननगर, न्यू गजानननगर, स्वप्ननगरी ते तिरुपतीनगरपर्यंत किमान १५ ते १६ घरांवर ही मार्किंग केलेली आजही दिसते. 
 
फक्त चर्चा झाल्या 
यासंदर्भात नगररचना विभागाने अतिक्रमण विभागाला सविस्तर अभिप्रायासह अहवालही सादर केला. तरीही अतिक्रमण विभाग जागचा हलला नाही. मंगळवारी रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतरही अतिक्रमण विभागाशी चर्चा केल्यानंतर अतिक्रमण काढणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात बांधकाम विभागाने अतिक्रमण विभागाशी चर्चा करताच काम सुरू केले. त्यामुळे हे काम होऊनही अडचण कायम राहणार हे स्पष्ट आहे. 
 
काय म्हणतात अधिकारी 
- मनपाच्या मूळमंजूर नकाशात हा रस्ता १५ मीटर रुंद आहे. त्यानुसार आम्ही मार्किंग करून दिली होती. याबाबत सविस्तर अहवालही पाठवला होता. त्यानुसार अतिक्रमण विभागाने अतिक्रमण काढणे अपेक्षित होते. - ए.बी. देशमुख, सहायकसंचालक, नगररचना विभाग 
 
- या मार्गावरील अतिक्रमण आम्ही काढले आहे. अर्थात काही ठिकाणी ते काढले नसेल तर आम्ही प्रत्यक्ष पाहणी करू आणि मगच कारवाई करू. -रवींद्र निकम, उपायुक्त,प्रशासन 
 
- रस्ता बांधकामात अडचण नाही. भविष्यात नव्याने कमी जास्त व्यासाच्या मलनिस्सारण वाहिन्या अथवा जलवाहिन्या, अन्य केबल टाकण्यासाठी अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. पण ते काम आमचे नाही. - बी.डी. फड, उपअभियंता
 
 
 
बातम्या आणखी आहेत...