आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघी स्मार्ट सिटीच उजळू शकते सौरऊर्जेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एखाद्या क्षेत्रात आवड असली आणि याला जिद्द-चिकाटीची जोड मिळाली की ते क्षेत्र पादाक्रांत करून नवी क्षितिजे गाठणे कधीच कठीण नसते. लातूर जिल्ह्यातील रहिवासी गुंडू मच्छिंद्र साबदे हे अशाच एका जिद्दी संशोधकाचे नाव. सौरऊर्जा हा त्यांचा अभ्यासाचा विषय. सोळा वर्षे अमेरिकेत राहून संबंधित कंपनीला सौरऊर्जेचे २९ पेटंट मिळवून देण्यात साबदे यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातून केवळ जिद्दीच्या बळावर यश मिळवणाऱ्या या संशोधकाविषयी...

मराठवाड्यात लातूरपासून ३५ किमीवर असलेले गणेशवाडी हे साबदे यांचे गाव. आईवडिलांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झालेले. शेतीत काबाडकष्ट करायचे आणि मुलांना शिकवायचे हा त्यांचा ध्यास. गुंडू शालेय जीवनात अभ्यासात प्रचंड हुशार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग गुंडू यांचा शिक्षणासाठी आजोळी भिंगोली, नंतर उदगीर असा प्रवास सुरू झाला.

दहावीत चमकला तारा... : लहानपणी गुंडू यांचा गणित विषय आवडीचा होता. दहावी-बारावीतही त्यांच्या बुद्धीची ही चमक दिली. दोन्ही इयत्तांमध्ये गुणवत्ता यादीत चमकलेल्या गुंडू साबदे यांनी मुंबईत यूडीसीटीला (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) प्रवेश घेतला. हीच खरी त्यांच्या आयुष्याला कलाटणी ठरली.

अडीच कोटी पगार सोडून भारतात... : उच्च शिक्षणानंतर गुंडू साबदे यांनी अमेरिकेत मायक्रॉन या प्रसिद्ध कंपनीत बारा वर्षे नोकरी केली. ही नोकरी म्हणजे केवळ तांत्रिकतेच्या अर्थाने नव्हती. एक संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या काळात नावलौकिक मिळवला. याच काळात या कंपनीला सौरऊर्जेच्या क्षेत्रात २९ पेटंट मिळाले. परंतु केवळ पैसा हे ध्येय न ठेवता भारतात येऊन काहीतरी वेगळे करण्याची त्यांची जिद्द त्यांना बसू देत नव्हती. म्हणूनच वर्षाकाठी अडीच कोटी रुपयांची कमाई असलेली नोकरी सोडून बारा वर्षांच्या नोकरीनंतर ते मायदेशी परतले. आज ते पुण्यात ‘रिलाय ऑन सोलार’च्या माध्यमातून देश-विदेशांत सौरऊर्जेबद्दलजागरुकता निर्माण करत आहेत. याकामी अनेक देशांत, अनेक संस्था, कंपन्यांना ते सल्ला देतात.

संशोधनात सिलिकॉन हेच लक्ष्य : साबदे यांनी सौर ऊर्जेवर संशोधन करताना सिलिकॉनसारख्या सेमीकंडक्टरवरच लक्ष्य केंद्रित केले. सौर पॅनलमध्येही सिलिकॉन हाच घटक महत्त्वाचा असतो. या पॅनलीची जाडी कमी करून त्यांची क्षमता वाढवण्यात साबदे यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे अगदी ढोबळ उदाहरण द्यायचे तर पाण्याचा एखादा बंब तापण्यास तीन तास लागत असतील तर तो आता अवघ्या पाऊण तासातच तापतो.

दुबईत केला यशस्वी प्रयोग : असा प्रयोग साबदे यांच्या सहकार्याने दुबईमध्ये करण्यात आला आहे. यात रात्रीसाठी लागणारी १ लाख मेगावॉट सौर ऊर्जा साठवून ठेवणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

सौर ऊर्जेसाठी भारतातही प्रचंड संधी... रेल्वे, धरणेही उपयुक्त : देशात विद्युत निर्मितीला आता मर्यादा येत आहेत. या काळात सौर ऊर्जा चांगला पर्याय ठरू शकतो. येणारे युगच सौर ऊर्जेचे असेल, असा दावा साबदे करतात. यासाठी ते पर्यायही सुचवतात...

रेल्वे बोगीजवर सोलार पॅनल लावून रेल्वेच सौर ऊर्जेवर धावू शकते. शिवाय उरलेली प्रचंड सौर ऊर्जा इतरत्रही वापरता येऊ शकेल. {धरणांतील जलसाठ्यांचाही उपयोग होईल. उदा. औरंगाबादनजीकच्या जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी पाण्यावरच कमी जाडीचे सौर पॅनल अंथरता येतील. यामुळे सौर ऊर्जाही प्रचंड प्रमाणात मिळेल आणि बाष्पीभवन थांबल्याने जलसाठाही अबाधित राहील. {यातील तांत्रिक फायदाही साबदे सांगतात. त्यांच्या मते सौर पॅनल पाण्यावर अंथरलेले असल्याने ते थंड राहतील व यामुळे पॅनलचे आयुष्य वाढेल, ऊर्जानिर्मितीही अधिक होईल. {घरांना असलेल्या खिडकीच्या काचांवरही सिलिकॉन फिल्म बसवून त्याद्वारे सौर ऊर्जा निर्मिती शक्य असल्याचा दावा साबदे करतात. हा प्रयोग अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आगामी काळात वास्तुरचनाकारांनाच सोलार फ्रेंडली व्हावे लागेल, असे ते म्हणतात.
एमटेक ते अमेरिका...
यूडीसीटीतून बाहेर पडल्यावर गेट परीक्षा उत्तीर्ण होऊन साबदे यांनी आयआयटी मुंबईतून एमटेक केले. त्यांना अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळाली. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत दाखल झाले. त्यांनी सौरऊर्जेवर सखोल संशोधन केले. ते आज भारताला अत्यंत मोलाचे ठरणारे आहे.
एकदाच ७०० कोटींचा खर्च, नंतर फक्त लाभच...
जागतिक पर्यटनस्थळ असलेले औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी होणार म्हणून सध्या जगभर चर्चेत आहे. ही अवघी स्मार्ट सिटीच सौरऊर्जेवर चालू शकते, असा गुंडू साबदे यांचा दावा आहे. यासाठी लागेल काय?
- एकदाच गुंतवणूक म्हणून ७०० कोटी खर्च करावा लागेल.
- जास्तीत जास्त ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमतेच्या बॅटरी लागतील.
- यात कमी जागेत, हलक्या वजनाची यंत्रणा तेवढीच महत्त्वाची.
- ही बॅटरी पण एकदा तयार केली की पंधरा वर्षे चालू शकेल.
संगणकाला शक्ती देण्यातही वाटा : संगणकात वापरला जाणारा रॅम ही त्याची शक्ती असते. हा रॅम म्हणजे एक चिप. यातही अर्थातच सिलिकॉनचा वापर केलेला असतो. सौरऊर्जेवर संशोधन करताना सिलिकॉनची ही चिप जास्तीत जास्त कॉम्पॅक्ट करून तिची शक्ती वाढवण्याचे तंत्र साबदे यांनी अमेरिकेत मायक्रॉन टेक्नॉलॉजीमध्ये काम करताना आत्मसात केले. तेव्हा या कंपनीने केलेले हे संशोधन संगणकात उतरले आणि एकेकाळी १२ ते ६० एमबी रॅमची शक्ती असलेला संगणक हळूहळू १ ते २ जीबी रॅम असा शक्तिवान झाला. हे श्रेय साबदे यांनी अमेरिकेत काम केलेल्या मायक्रॉन कंपनीलाच जाते.