आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्याचे सायकलस्वार जवान शहरात दाखल, युवकांमध्ये सैन्यासंबंधी केली जागृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॅलीहून परतलेल्या जवानांचे स्वागत करताना ब्रिगेडियर मनोजकुमार. - Divya Marathi
रॅलीहून परतलेल्या जवानांचे स्वागत करताना ब्रिगेडियर मनोजकुमार.
औरंगाबाद- तुळजापूरते औरंगाबाद हा पाचशे कि. मी. चा पल्ला पार करीत सैन्याचे सात सायकलस्वार जवान शहरात दाखल झाले. छावणीच्या ९७ आर्टिलरी ब्रिगेडच्या वतीने त्यांचे सोमवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. युवकांमध्ये सैन्यासंबंधी जाणीव जागृतीचे काम त्यांच्या सायकल मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट होते.

शहरातील ९७ आर्टिलरी ब्रिगेडमधील २२ मेडियम रेजिमेंटच्या सात जवानांनी तुळजापूर ते औरंगाबाद सायकल मोहीम फत्ते केली. तुळजापूर, सोलापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद असा सुमारे पाचशे कि. मी. पल्ला जवानांनी सायकलद्वारे पार केला. उपरोक्त मार्गावरील ऐतिहासिक वास्तूंना जवानांनी भेटी दिल्या. गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेताना तेथील शस्त्रास्त्रांचाही अभ्यास केला. मार्गावरील गावांमध्ये सैन्यासंबंधीचे महत्त्व युवकांना सांगितले. देशासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहनही त्यांनी केले. सायकल मोहिमेत कॅप्टन श्रीकुमार, नायब सुभेदार रविकांत, नायक कप्तानसिंग, लान्स हवालदार गणेश सहाय, हवालदार सॅम्युअल, लान्स नायक धर्मेंद्रसिंग, नायक के. वंगजन सहभागी झाले होते. ९७ आर्टिलरी ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर मनोजकुमार विशेष सेवा मेडल यांनी त्यांचे स्वागत केले. सैन्याचे सत्तरपेक्षा जास्त जवान आतापर्यंत सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करून आले आहेत. झाशीची राणी, कुवरसिंह मंगल पांडे होण्याची संधी केवळ सैन्यातच प्राप्त होते असे सांगत त्यांनी युवकांना सैन्यात दाखल होण्याचे आवाहनही केले. ले. कर्नल राजेश सहा यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपकमांडर कर्नल तरुणकुमार, २२ रेजिमेंटचे कर्नल कुणाल मुखर्जी, ६९ रेजिमेंटचे कर्नल विवेक भटारा, लेफ्टनंट कर्नल अमितसिंग आदींची उपस्थिती होती.