आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर: नगरपालिका आणि महावितरण अधिकाऱ्यांचा वाद ठाण्यात; रात्री उशिराने पथ‘दिवे’ लागले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- नगरपालिका आणि महावितरण कंपनी या दोन शासकीय कार्यालयाशी एकमेकांकडे असलेल्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांच्या वादातून पोलिस स्टेशनची पायरी गाठल्यामुळे शहरवासीयांना सलग दुसऱ्या दिवशी बंद असलेले पथदिवे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे रात्री उशिरा सुरू करण्यात आले. 

दरम्यान थकीत रकमेच्या वसुलीसाठी दोन्ही शासकीय कार्यालयांनी घेतलेल्या दांडगाईच्या भूमिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेच्या नागरी क्षेत्रातील ६८ पथदिव्यांच्या  २ कोटी ७८ लाख रुपये थकीत रकमेसाठी महावितरण कंपनीने गुरुवारी सायंकाळी पथदिव्यांची विद्युत पुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई केली होती. या कारवाईनंतर नगरपालिका प्रशासनाने महावितरण कंपनीकडे ३ कोटींची थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी वैजापूर उपविभाग १ या कार्यालयाला सील ठोकण्याची कारवाई केली. दरम्यान शुक्रवारी या प्रकरणात दोन्ही कार्यालयाकडून तोडगा निघण्याएेवजी एकमेकांवर कायदेशीर कुरघोडी करण्याचा चांगलाच प्रकार घडला होता. 

महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, विधी अधिकारी सुनील पावडे, उपकार्यकारी अभियंता प्रकाश तौर यांनी सायंकाळी वैजापूर स्टेशन गाठून पालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांनी मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकल्यामुळे अर्ध्या तालुक्याचा कारभार विस्कळीत झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान पालिकेला महावितरण कंपनी आपल्या विरोधात तक्रार दाखल करण्याची कुणकुण लागताच पालिकेचे सीओ डाके व कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठून शहरातील पालिकेचे पथदिवे व दिवेची जोडणी तार तोडून बंद केल्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी अंधार झाला आहे. 

वास्तविक पालिकेकडे महावितरणची थकीत रक्कम २०१० पूर्वीची असून चालू विद्युत बिले पालिकेने नियमित अदा केले. विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी पालिका महावितरण कंपनीला १० लाखांचा धनादेश देण्यास तयार होते. मात्र त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. पालिकेने प्रतीकात्मक स्वरूपात महावितरण कंपनीच्या कार्यालयाला सील केले, त्यांचे कोणतेही कार्यालयीन कामकाज बंद पडलेले नाही उलट पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या अंधाराचा त्रास सोसावा लागत असून कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी महावितरण कंपनीची असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची तक्रार पालिका प्रशासनाने दिली होती. दरम्यान, दोन्ही कार्यालयातील वाद टोकाला पोहाेचल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे गटनेते साबेर खान व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी पोलिस स्टेशन गाठून दोन्ही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांत मध्यस्थी घडवून आणली. 

पदाधिकारी आक्रमक  
साबेर खान आणि डॉ. दिनेश परदेशी यांनी पथदिवे सुरू न झाल्यास नागरिकांमार्फत पोलिस ठाण्यात महावितरण कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेऊ, असा इशारा दिला होता. दरम्यान दोन्ही पदाधिकारी यांनी खासदार खैरे यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर खैरेंनी तातडीने महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याशी संपर्क साधत पथदिवे सुरू करण्याची मागणी केली. गणेशकर यांनी पथदिवे सुरू करण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...