आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: पीआय-पोलिस शिपायात वाद; एसपींकडून शिपाई निलंबित, गैरहजर राहणाऱ्यांचेही निलंबन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पुण्याला बंदोबस्तासाठी का पाठवता? यावरून पोलिस निरीक्षक शिपायांत पोलिस ठाण्यातच वाद झाला. या वादात शिपायाने पोलिस निरीक्षकाला शिवीगाळ करत धमकी दिल्याने पोलिस अधीक्षकांनी शिपायाला तडकाफडकी निलंबित केले. दुसऱ्या प्रकरणात ठाण्यात गैरहजर असलेल्या आणखी एका पोलिसाचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य ठाण्याच्या दोन पोलिसांना मुख्यालयाशी जोडण्यात आले आहे. 
 
बीड पोलिसांकडून पुण्याच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. शिवाजीनगर ठाण्यातील पोलिस शिपाई संघर्ष गोरे यांनाही बंदोबस्तासाठी पाठवण्यात येणार होते, परंतु पुण्याला जाण्यास ते तयार नव्हते. मला पुण्याला बंदोबस्तासाठी का पाठवता ? या कारणावरून गोरे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन वाद झाला. 

तुम्ही जाणीवपूर्वक मला बंदोबस्तासाठी पाठवत असल्याचे म्हणत गोरे यांनी कस्तुरे यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची तक्रार कस्तुरे यांनी वरिष्ठांकडे केली. 

गुरुवारी दुपारी हा गोंधळ झाल्याने उपअधीक्षक गणेश गावडे यांनी शिवाजीनगर ठाण्याला भेटही दिली होती. गावडे यांनी प्रकरणाचा अहवाल पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना पाठवला होता. श्रीधर यांनी संघर्ष गोरे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले. पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचा धडाका लावणाऱ्या जी. श्रीधर यांनी पहिल्यांदाच पोलिसांवर कारवाई केल्याचे प्रथमच पाहावयास मिळत आहे. 

बेशिस्त खपवून घेणार नाही 
- जिल्हा पोलिसदलाची प्रतिमा कोणत्याही कारणाने खराब होणार नाही, असे कृत्य करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही.
-जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड 
 
गुरूवारी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गोंधळ घालून पसार 
पोलिस संघर्ष गोरे यांनी दुपारी पोलिस निरीक्षकांना दमबाजी केल्यानंतर पुन्हा गुरुवारी रात्री शिवाजीनगर ठाण्यात येऊन गोंधळ घातला. त्याला आवरण्यासाठी आरसीपीही शिवाजीनगर ठाण्यात बोलावण्यात आली होती. पण त्यापूर्वीच तो निघून गेल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे आता पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात होणारे वाद चव्हाट्यावर येत अाहेत. त्यामुळे कर्मचारीही वरिष्ठांना भीत नसल्याचे दिसून येत आहे. 
 
पीआयची शहर ठाण्यात तक्रार 
या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिस शिपाई संघर्ष गोरे यांच्याविरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे. 
 
गैरहजर पोलिसांचेही केले निलंबन 
शिवाजीनगर ठाण्याचे हवालदार ए. के. सानप हे २११ दिवसांपासून ठाण्यात गैरहजर आहेत. त्यांच्याकडे असलेला अनेक प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. त्यामुळे श्रीधर यांनी ए. के. सानप यांनाही निलंबित केले आहे. पंचनामा करून सानप यांच्या कपाटाचे कुलूप तोडण्यात आले असून त्यांच्याकडील तपास इतरांकडे देण्यात येणार आहे. उपअधीक्षक गणेश गावडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य ठाण्याचे दोन कर्मचारी मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...