आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथदिंडीने वेधले लक्ष, महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी अन् लेझीम ठरले आकर्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षक साहित्य संमेलनाच्या प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत गोदावरी पब्लिक स्कूल आणि जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम सादर करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. - Divya Marathi
शिक्षक साहित्य संमेलनाच्या प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत गोदावरी पब्लिक स्कूल आणि जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम सादर करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
औरंगाबाद- दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने झाला. जगद्गुरू संत तुकोबाराय नाट्यगृह ते एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहापर्यंत निघालेल्या ग्रंथदिंडीत सहभागी महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 
 
ग्रंथदिंडीचे उद्घाटन रा.रं.बोराडे यांनी केले. यात गोदावरी पब्लिक स्कूल अन् जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. शाहू महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी उंटावर, तर महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी आदी महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, वाचाल तर वाचाल, साक्षर जनता भूषण भारता हे साक्षरतेचे महत्त्व पटवून देणारे फलक ग्रंथदिंडीत झळकवण्यात येत होते.
 
संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बालाजी इंगळे यांनी, शिक्षकांमधील सृजनशीलतेला वाव मिळण्यासाठी त्यांच्यावर कामे लादण्याचे आवाहन केले. समारोपात प्राचार्य रा.रं.बोराडे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांचे महत्त्व आहे. अनेक शिक्षकांमध्ये चांगला साहित्यिक आहे. परंतु जगण्याचे प्रश्न सुटल्याशिवाय कलानिर्मिती भरभरून करता येत नाही. त्यामुळे वेतन नसलेला शिक्षक लिहू शकेलच असे वाटत नाही. एकीकडे असे विदारक चित्र असताना दुसरीकडे, शिक्षकांबरोबरच मुलेदेखील लिहीत आहेत. शिक्षकच मुलांना लिहिते करू शकतात. त्यामुळे शिक्षकांनी त्यांची क्षमता वाढवावी. त्याच वेळी शिक्षक म्हणून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे. लिहिलेल्यांनी लिहिते झालेल्यांचा वाङ्मयकोश तयार करावा, अशी अपेक्षा बोराडे यांनी व्यक्त केली. काही शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, भुसनीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या “शब्दांकुर’ या विशेषांकाचे आणि “धुळाक्षरे’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांना विमानाने सहल घडवणाऱ्या एस.एम.बुरकुल या शिक्षकाचा सन्मान करण्यात आला. विक्रम काळे यांनी मनोगत व्यक्त केले. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता बाळसराफ यांनी आभार मानले. 
 
 
विचार स्वातंत्र्य हिरावू शकत नाही : बाबा भांड 
लिहिण्यासाठी आज अनुकूल अशी स्थिती नाही, असे म्हटले जाते. तशा काही प्रमाणात घटनाही घडल्या आहेत. मात्र लोकशाहीत लिखाण आणि विचारस्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे मत संमेलनाचे उद्घाटक बाबा भांड यांनी व्यक्त केले. संस्कारशील लिखाण करणाऱ्या शिक्षकांची आज गरज असून शिक्षकांमुळेच मुलांवर वाचन, लेखनाचे संस्कार झाल्याचेही ते म्हणाले. वि.स.खांडेकर ग्रंथनगरीचेही उद्घाटन भांड यांनी केले.
 
विशेष सत्कार अन् उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार 

मराठवाड्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते परभणीचे आसाराम लोमटे, प्रा. वीरा राठोड आणि प्रा.रवी कोरडे यांचा विशेष सत्कार, त्याचबरोबर डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०१६ चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यंदा हा पुरस्कार शारदा बर्वे (अध्ययन, अक्षमता आणि मुले, ज्योत्स्ना प्रकाशन), डॉ. राजा दांडेकर (अशी घडली माणसे, उन्मेष प्रकाशन), डॉ.श्रुती पानसे (बहुरंगी बुद्धिमत्ता, नितीन प्रकाशन) यांना प्रदान करण्यात आला. 
 
निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले 
‘या बायकोला कितीदा समजून सांगायचं, मी मास्तर म्हणून मला ही दिली. चला, मामाची म्हणून मी हिला केली’, “दिवसभर शाळा, रात्री पुस्तक, संसाराकडे बघा जरा’ अशा एकाहून एक सरस कवितांनी शनिवारच्या सायंकाळी शब्द झुल्यावर हे निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले. कविसंमेलन अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अशोक कोतवाल यांनी ‘मनोगत’ या कवितेतून मधल्या सुटीत पळून जाणाऱ्या मुलांचे भावविश्व सादर केले. अरुण पवार यांनी “वाटणी’ कवितेतून उतारवयात आईबापांच्या हालअपेष्टांचे वर्णन केले. सुनंदा कांबळे यांनी “आंधळं प्रेम’मधून प्रेमासाठी वाटेल ते करणाऱ्या अन् विवाहित पुरुषावर प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या मनातील भाव मांडले. जिजा शिंदे यांनी गाव, कविता नरवडे यांनी मास्तर महिमा, स्वाती शिंदे-पवार यांनी मास्तरकी, शिक्षकांचे परिश्रम या विषयावर कविता सादर केल्या. 
 
बातम्या आणखी आहेत...