आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपलेल्या तेरावर्षीय मुलीची वेणी कापली, रात्री 11 वाजता घडला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भावंडांसोबत घरात झोपलेल्या एका तेरावर्षीय मुलीची वेणी कापल्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जहागीरदार कॉलनीत घडला. देशभर महिलांचे केस कापण्याच्या घटना घडत असताना शहरातही अशा घटना सुरू झाल्याने महिला, महाविद्यालयीन तरुणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलीच्या कुटुंबाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
तेरावर्षीय सना (नाव बदलले आहे) सोमवारी रात्री मोठी बहीण इतर भावंडांसोबत आतल्या खोलीत झोपली होती. तिचे आई-वडील, काका-काकू घरातच होते. रात्री अकरा वाजेच्या सुमारास तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी उठली. डोक्यावरून हात फिरवला असता वेणी नसल्याचे जाणवले. तेव्हा वेणी पलंगावर पडलेली दिसताच घाबरून आरडाओरड सुरू केली. आई-वडिलांनी तिच्या खोलीत धाव घेत धीर दिला. कुटुंबाने वेदांतनगर पोलिसांना याची माहिती देताच ते तत्काळ घटनास्थळी आले. मुलीची घाटी रुग्णालयात तपासणी करून घटनेची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल उत्तम जाधव तपास करत आहेत. 
 
घरात सर्व होते, मुलगी शेवटच्या खोलीत : घटनेच्या वेळी सर्व सदस्य घरातच हाेते. कुणावर संशयही नसल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. सनाच्या वडिलांचे वॉशिंग सेंटर असून एकत्र कुटुंब असल्याने आई-वडिलांसह, काका-काकू, चुलत भावंडे घरातच होती. सलग चार खोल्यांच्या घरात सना शेवटच्या खोलीत पलंगावर भिंतीकडून झोपली होती. तेव्हा केस कापले कसे गेले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. 
 
छावणीप्रकरण संशयितच : छावणी बाजारात चार दिवसांपूर्वी असेच एका महिलेचे केस कापल्याचा प्रकार समोर आला होता. महिला बाजारात खरेदी करताना हा प्रकार घडला. चोरट्याकडून तिच्या खांद्यावरील पर्सचा बंद कापण्याच्या प्रयत्नात तिचे केस कापले गेले असावेत, असे छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदरसिंग बहुरे म्हणाले. 
 
कलमांमध्ये पोलिसांचा गोंधळ : केस कापण्याच्या प्रकारात नेमक्या कुठल्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, याबाबत पोलिसांमध्येच गोंधळ आहे. मात्र विनयभंगाचे मूळ कलम ३५४ (स्त्रीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य), ३५४-ड (पाठलाग करणे) आणि ३५५ (कोणत्याही प्रकारे लज्जास्पद वाटेल असे कृत्य करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल होतो. मुलगी अल्पवयीन असल्यास पोक्साअंतर्गत कलम वाढवता येते, असे अॅड. अभयसिंह भोसले यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...