Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About The Organizers Of The Meeting Returned The Publisher To 1000 + 1

...आणि संमेलनाच्या आयोजकांनी प्रकाशकाला परत दिले १०००+१ रुपये

नामदेव खेडकर- ९९२२८९३३५८ | Apr 21, 2017, 14:43 PM IST

औरंगाबादमध्ये नुकतेच शिक्षक साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाला अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन आणि समाराेपालाही शिक्षक आणि साहित्य रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचा दावाही आयोजकांनी केला. मात्र, संमेलन संपल्यानंतर औरंगाबादमधीलच एका प्रकाशकाने फेसबुकच्या माध्यमातून संमेलनानिमित्त भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनात एक हजार रुपये देऊन स्टॉल लावला, पण अपेक्षित पुस्तक विक्री झाली नाही, अशी पोस्ट टाकली. त्यावर तिखट प्रतिक्रिया आयोजक, साहित्य रसिकांनी नोंदवल्या. त्यानंतर मात्र प्रकाशकाने आपली ही पोस्ट मागे घेऊन ती एडिट केली, पण संतप्त आयोजकांनी प्रकाशकाला त्यांनी भरलेले हजार रुपये आणि वर अधिकीचा एक असे एक हजार एक रुपये परत केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच यांच्या वतीने १५ १६ एप्रिल रोजी एमजीएममधील रुक्मिणी हॉलमध्ये राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन भरवण्यात आले हाेते. मागील महिनाभर या संमेलनाची पूर्वतयारी सुरू होती. संमेलनासाठी राज्यभरातून तब्बल दोन हजार शिक्षक या संमेलनासाठी आल्याचे आयोजकांनी सांगितले. यामध्ये कथाकार, कवी, स्तंभलेखक आणि प्रयोगशील शिक्षकांचा सहभाग होता. संमेलनाचा समारोप मराठी अभिजात भाषा संशोधन समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी हे संमेलन भरून पावले, अशी प्रतिक्रिया भाषणातून दिली होती.
पण इकडे संमेलन झाल्यानंतर मंगळवारी १८ एप्रिल रोजी शहरातील जनशक्ती प्रकाशनचे श्रीकांत उमरीकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट टाकली. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर २०० लोकांची नावे होती. मी एक हजार रुपये भाडे देऊन पुस्तक विक्रीचा स्टॉल बुक केला होता. आयोजकांनी संमेलनावर एवढा मोठा खर्च केला, मात्र अवघी १३०० रुपयांची पुस्तक विक्री झाली.’ या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी संमेलनाच्या यशस्वितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे वाटल्याने अनेकांनी या पाेस्टवर तत्काळ तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. संयोजन समितीमधील स्वयंसेवक आणि साहित्य रसिकांनीही उमरीकर यांच्यावर कॉमेंटच्या माध्यमातून शाब्दिक हल्ला केला. तसेच आयोजकांच्या वतीने उमरीकर यांना एक हजार एक रुपये असलेले बंद पाकीट घरी नेऊन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी ती पोस्ट स्वत:च्या वॉलवरून काढून टाकली. त्यानंतर एक नवीन पोस्ट टाकली. ती अशी...‘शिक्षक साहित्य संमेलनासंदर्भात मी काल पोस्ट टाकली होती. त्यात आमच्या प्रकाशनाच्या नुकसानीसंदर्भात मजकूर होता. आयोजक सुबोध जाधव यांच्या नावे एक पाकीट मला सहकाऱ्याने आणून दिले. त्यात स्टॉलच्या भाड्याचे पैसे आहेत. माझे आर्थिक नुकसान भरून दिल्याबद्दल धन्यवाद. मी यानिमित्ताने विचारलेला प्रश्न गंभीर आहे. तो केवळ एका संमेलनापुरता, एका लेखकापुरता, एका पुस्तकापुरता नाही हे लक्षात घ्यावे. या विषयावरची चर्चा नको तिथे जात आहे हे पाहून ती पोस्ट मी काढून टाकत आहे.’
पुढील स्लाईडवर सविस्तर वाचा साहित्यकांची मते....

Next Article

Recommended