आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतसाठ्यातून सहा महिने भागवावी लागणार तहान, १० टक्के पाणी कपात सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आठ दिवसांपूर्वी मृतसाठ्यात आला असून याच मृतसाठ्यातून मराठवाड्यातील औरंगाबादसह जालन्याला पाणीपुरवठा सुरू आहे.
मागील महिन्यापासून पैठण, जालना व परभणी जिल्ह्यांतील सहा बंधाऱ्याला पाणी सोडले जात होते. आजमितीस बंधाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे आवर्तन १.४१ टीएमसी हे संपल्याने पुरवठा बंद केला आहे. मृतसाठ्यातूनदेखील आठ दिवसांत एक टीएमसीच्या जवळपास पाणी उपसले गेले आहे. औरंगाबादसह जालन्याला जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पुरवठा सुरू आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी वापरल्यास पुढील सहा महिने हे पाणी पुरेल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. शिवाय १० टक्के पाणी कपात सुरू आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून औरंगाबादसह जालना जिल्ह्यावर पुन्हा पाणीकपातीचे संकट वाढणार आहे.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सलग यंदा चौथ्यांदा मृतसाठ्यात आला आहे. जायकवाडीत नोव्हेंबरमध्ये दारणा, मुळा, भंडारदरा आदी धरणातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यापैकी सहा टीएमसीच्या वर पाणी जायकवाडीत आले. त्या वेळी जायकवाडीचा पाणीसाठा पाच टक्क्यांवर होता. वरील धरणातून पाणी आल्याने तो ११ टक्क्यांपुढे गेला. हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल. असे असताना पाटबंधारे विभागाने या पाण्याचे कोणतेच नियोजन केले नसल्यामुळे आजघडीला उन्हाळ्यापूर्वीच पाणीसाठा मृत साठ्यावर आला आहे. याच मृतसाठ्यातून एक टीएमसीच्या वर पाणी पैठणमधील आपेगाव, हिरडपुरी, जालना व परभणी जिल्ह्यांतील सहा बंधाऱ्यांना १.४१ टीएमसी पाणी देण्यात आले. मृतसाठ्यातील ७३८ द ल घ मी पाण्याचा विचार करता यात गाळाचे प्रमाण पाहता वापरता येईल असे पाणी फक्त ३५० द ल घ मी आहे. हे पाणीही बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने बाष्प जास्त होत आहे.
रोज होतेय बाष्पीभवन
सध्या रोज ०.८३३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. हे प्रमाण आणखी वाढणार असल्याने मृतसाठ्यात सहा महिने तहान भागवण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

आठ दिवसांपूर्वीच धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यात आला आहे. जी कपात सध्या होत आहे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यावर निर्णय होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
- अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग
बातम्या आणखी आहेत...