आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:साहस : देवगाव रंगारी येथे घरफोडी; दोन लाखांचे मोबाइल लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
देवगाव रंगारी  - अजमेरला देवदर्शनाला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी देवगाव रंगारी येथील शिक्षक कॉलनीतील मोबाइल व्यापाऱ्याचे घर फोडून एकूण २ लाख ११ हजार रुपये किमतीचे  मोबाइल लंपास केले तसेच रोख  ५० हजार व पत्नीचे  सोन्या- चांदीच्या ३ लाख १५ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारून धाडसी चोरी केली. ही घटना बुधवार रात्री ते शनिवारी रात्रीदरम्यान घडली. याबाबत देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात  अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  
 
या बाबत सविस्तर  अशी माहिती दिली की, देवगाव रंगारी येथील बसस्थानक परिसरात मोबाइल विक्री करणारे शकील अब्दुल करीम मणियार हे आपल्या कुटुंबीयांसह दि. ५ जुलैला रात्री अजमेर येथील दर्ग्यावर दर्शनासाठी गेले होते व सर्व कुटुंब दि. ९ जुलै रविवार रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास परत आल्यावर समोरील घरचा दरवाजा उघडून आत गेल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शकील मणियार यांनी त्वरित पोलिस ठाणे गाठून चोरीची फिर्याद दिली.  
 
शकील मणियार यांच्या निवासस्थानी कोणी नसल्याचे संधी साधून चोरट्यांनी दि. ५ जुलै ते ८ जुलैच्या दरम्यान घराच्या मागील बाजूच्या कंपाउंड भिंतीलगतच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी आणलेले ओप्पो, विवो, सॅमसंग आदी कंपन्यांचे २६ मोबाइल संच (एकूण किंमत २ लाख ११ हजार रुपये) चोरट्यांनी लंपास केले.  नंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली.  शकील यांनी घरात  तपासणी  केल्यानंतर  पत्नीचे सोन्या-चांदीचे दागिन्यांसह ३ लाख १५ हजार व रोकड ५० हजार रुपये चोरीस गेले असल्याची नोंद पोलिस ठाण्यात घेण्यात आली.     
 
वैजापूरचे पोलिस उपाधीक्षक सुनील लांजेवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग  यांनीही भेट दिली. या वेळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांनी तपासणी केली. याप्रकरणी अधिक तपास सपोनि राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम साबळे, शेख जावेद, बी. बी. खुळे करत आहेत.
 
देवगाव फाट्यावर श्वान घुटमळले  
चोरट्यांचा माग घेण्यासाठी औरंगाबाद येथून श्वानपथक बोलावण्यात आले. शकील यांच्या घरापासून ते देवगाव फाट्यापर्यंत गेल्यानंतर श्वान काही वेळ घुटमळले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 
बातम्या आणखी आहेत...