आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी पाककृती आणि खेळांनी भरला स्नेहमिलनामध्ये उत्साह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तेजस्विनी मंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने स्नेहमिलन सोहळ्याचे नुकतेच आयोजन केले होते. यात तिरंगी पाककृती, वेशभूषा आणि खेळांनी रंगत आणली. कार्यक्रमात इडली, बर्गर आणि तिरंगी गोडभात यासारखे पदार्थ लक्षवेधी ठरले. गारखेड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात बुधवारी, फेब्रुवारी रोजी झालेल्या सोहळ्यात २०० महिलांची उपस्थिती होती. 
 
महिलांचा हातखंडा असलेल्या पाककृती स्पर्धेचे वेगळेपण सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्र बनले होते. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा ज्योती शिराळकर, उपाध्यक्ष सीमा गावरस, रेखा हिवरे, वैशाली कांजीकर, गंगा अग्रवाल यांची उपस्थिती होती. तिरंगा संकल्पनेवर महिलांनी घरूनच पदार्थ तयार करून आणले होते. कार्यक्रमस्थळी महिलांना सजावटीसाठी वेळ देण्यात आला होता. 
 
एकापेक्षा एक पाककृतींची महिलांनी आकर्षकरीत्या सजावट केली. यामध्ये भाताचे प्रकार, इडली, बर्गर अशा पदार्थांचा समावेश होता. यामध्ये नीलिमा देशपांडेंच्या इडली बर्गरने प्रथम, तर संपदा वाघ यांच्या तिरंगी गोडभाताने द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारली. महिलांनी निर्माण केलेल्या घरगुती वस्तूंचे स्टॉल या वेळी लावण्यात आले होते. यामध्ये वाळवणाचे पदार्थ, कपड्यांच्या स्टॉल्सवर विशेष गर्दी झाली होती.
 
 कार्यक्रम यशस्वितेसाठी सविता खोडेगावकर, राजलक्ष्मी भाजीभाकरे, अंजू मुळावेकर, शीतल सुरडकर, सुलोचना तिवारी, वैशाली देवकर, सुनीता पेडभाजे, रेखा बारहाते, अंजली अयाचित, नेहा देशपांडे आणि दीपाली मुळे यांनी सहकार्य केले. सक्षमीकरणाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या मंडळाचा मार्गदर्शक व्याख्याने आणि कार्यक्रमाच्या आयोजनावर भर असतो. मागील काळात हे उद्दिष्ट साध्य केल्याचे या उपक्रमातून दिसून आले. 
 
नवी दिशा अन् ऊर्जा देणारे सोहळे 
- तेजस्विनी ग्रुप महिलांना नवी दिशा आणि ऊर्जा देण्याचे काम करत आहे. पुढील काळातही याला अधिक चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांना उद्योगासाठी व्यासपीठ दिले जाते. गृहोद्योगाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रेरणा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्योती शिराळकर, अध्यक्षा 
 
सांगीतिक खेळात रंगली चुरस 
उपस्थितांसाठी संगीतमय खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगी फुगे फुगवण्यात आले अन् हे फुगे एकमेकींकडून पास करण्यात आले. संगीत थांबल्यावर जिच्या हातात फुगा असेल तिने गाणे गायचे, अशी स्पर्धा चुरस निर्माण करणारी होती. आपण खेळात बाद होऊ नये याचा प्रयत्न प्रत्येक जण करत होती. 
बातम्या आणखी आहेत...