आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोळंबा : शौचालय बांधूनही पाणी अन् ड्रेनेजलाइनअभावी वापर बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा तांड्यातील नागरिकांना स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधून देण्यात आले. मात्र, ड्रेनेजलाइन तसेच पाण्याअभावी निम्म्यापेक्षा जास्त नागरिकांना सकाळी पांदीतच जावे लागत असल्याचे समोर आले आहे. तांड्यावर पाणी पुरवण्यासह ड्रेनेजलाइन टाकण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 
 
सातारा गावापासून हाकेच्या अंतरावरील तांडा क्रमांक एकमध्ये आठ महिन्यांपूर्वी मनपाच्या पथकाने सर्वेक्षण केले. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांची म्हणजेच शौचालय नाही अशा घरांची माहिती जमा करण्यात आली. अशा ७० पेक्षा जास्त घरांचा सर्व्हे करून शौचालये बांधण्यासाठी रहिवाशांना निधी देण्यात आला होता. त्यातून तेथील नागरिकांनी शौचायलेही बांधली. मात्र, या भागात ड्रेनेजलाइन टाकली नसल्याने नवीच समस्या निर्माण झाली. त्यानंतर काहींनी शोषखड्डे तयार केले, परंतु पाणीप्रश्नही गंभीर असल्यामुळे ही शौचालये बंदच आहेत. या प्रकारामुळे शासन ज्या उद्देशाने स्वच्छ भारत अभियान राबवत आहे, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे समोर येत आहे. 

ड्रेनेजलाइन टाका 
- नागरिकांना शासनाकडून शौचालये देण्यात आली आहेत. मात्र, ड्रेनेजलाइनअभावी त्यांचा वापर शक्य नाही. त्यामुळे मनपाने ड्रेनेजलाइन टाकून देण्याची व्यवस्था करावी.
-मोहन पवार, नागरिक, सातारा तांडा 

नाल्याचीही समस्या 
- आम्हाला मनपाकडून पाणी पुरवले जात नाही. वापरलेले पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची व्यवस्थाही नाही. त्यामुळे रस्त्यांसह घरांसमोरही घाण पाणी साचते. त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
-कमलाबाई चव्हाण, सातारा तांडा 

-  सातारा गावासह तांड्यावर ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी आराखडा तयार करून तशी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी अवधी लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी शोषखड्ड्यांचा वापर करावा.
-पी. जी. पवार, वॉर्ड अभियंता

पाणी दूषित होण्याची भीती 
महापालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना गावाजवळील विहीर आणि बोअरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. परंतु शोषखड्ड्यातील शौचालयाचे पाणी वाहून विहीर आणि बोअरच्या पाण्यात मिसळून पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने शौचालयाचा वापर करण्यात येत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...