आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्डातील हजार रहिवाशांना नगरसेवक दाखवणार ‘टॉयलेट’, प्रमोद राठोड यांचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रमोद राठाेड, नगरसेवक तथा भाजप गटनेते - Divya Marathi
प्रमोद राठाेड, नगरसेवक तथा भाजप गटनेते
औरंगाबाद - वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी मनपा प्रशासनाच्या प्रयत्नांना हवे त्या प्रमाणात यश मिळालेले नाही. त्यामुळे वैयक्तिक शौचालयाच्या वापराबाबत नागरिकांनी सजग व्हावे यासाठी विश्रांतीनगर वॉर्डातील एक हजार नागरिकांना ‘टॉयलेट’ हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय नगरसेवक तथा भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी घेतला आहे. या नागरिकांना बुधवारी पीव्हीआर थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. 
 
 
वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी १२ हजारांचे अनुदान दिले जाते. याबाबत सर्वस्तरावरून प्रयत्न होऊनही उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या शून्यावर आलेली नाही. विशेष म्हणजे शहरातील अनेक लाभार्थींनी शौचालय बांधण्यासाठीचा पहिला हप्ता उचलूनही टॉयलेट बांधलेच नाही. अशा प्रकारांमुळे ही याेजना राबवण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. 
 
त्यातच शौचालये उभारण्यासाठीची मुदत संपत अाल्यामुळे मनपा प्रशासनाने बैठका घेण्यासह संबंधितांना आदेश देण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यात प्रशासनाला यश येत नसल्याने राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेबाबत तसेच वैयक्तिक शौचालयाच्या वापराबाबत नागरिकांनी सजगपणे विचार करावा, वैयक्तिक शौचालय बांधणे का आवश्यक आहे, त्याची खरेच गरज आहे का? यावर भाष्य करणारा ‘टॉयलेट’ हा चित्रपट दाखवण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार बुधवारी (१६ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजता वॉर्डातील नागरिकांसाठी एक हजार तिकिटांची बुकिंगही त्यांनी करून घेतली आहे. 
 
३०० शौचालये बांधली : विश्रांतीनगरवॉर्डाच्या काही भागात झोपडपट्टी, तर काही भागांत मध्यमवर्गीयांचे वास्तव्य आहे. तसेच गुंठेवारीचाही काही भाग आहे. या वॉर्डात राठोड यांच्या प्रयत्नातून ३०० वैयक्तिक शौचालये बांधून देण्यात आली आहेत. 
 
मात्र, त्यानंतरही दिवस उजाडताच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या अजूनही शून्यावर आलेली नाही. त्यामुळे या भागात शौचालयाच्या वापराबाबत मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
चित्रपटामुळे मानसिकता बदलेल 
मी स्वत:हा चित्रपट पाहिला आहे. वैयक्तिक शौचालयाच्या वापराबाबत प्रशासन प्रयत्न करत असले तरी नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे एक हजार नागरिकांना हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय मी घेतला. त्यातून त्यांचीही मानसिकता बदलेल.
-प्रमोद राठाेड, नगरसेवक तथा भाजप गटनेते 
बातम्या आणखी आहेत...