आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

३०% नापास, वाहतुकीचे नियमच माहीत नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आज घडीलावाहन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. मात्र, ते चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आणि सुरळीत प्रवासासाठी परिवहन विभागाने काही नियम घालून दिले आहेत. ते वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाला माहिती असायलाच हवेत. पण त्यात काय विशेष, त्याची तर सर्वांनाच माहिती असते, असा आपला समज आहे. मात्र, तो गैरसमज असल्याचे डीबी स्टारच्या तपासात उघड झाले. आरटीओच्या वतीने लर्निंग लायसन्ससाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत वेगवेगळ्या महिन्यांत तब्बल २५ ते ४० टक्क्यांपर्यंत परीक्षार्थी नापास होत असून याची सरासरी ३० टक्के इतकी आहे. कडक व्यवस्थापनामुळे लर्निंग लायसन्सबाबतची ही सध्याची स्थिती आहे. पण यापूर्वीचे बहुतांश नापास, ढकलपास परीक्षार्थी दलालांच्या ‘सौजन्याने’ रस्त्यांवर गाड्या चालवत आहेत, हेही वास्तव. काय आहे सध्याची स्थिती, या परीक्षेत आपण कोठे आहोत, वाहतूक नियम माहिती नसल्याचे काय परिणाम होतात, याबाबत डीबी स्टारची ही विशेष मालिका...

ऑगस्ट २०१६ या महिन्यात ३०९१ जणांनी लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा दिली होती, यापैकी ७४७ जण नापास झाले होते. त्यांना वाहतूक नियमांच्या १५ पैकी प्रश्नांचीही बिनचूक उत्तरे देता आली नाहीत. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते.

संगणकीय प्रणालीचा अवलंब केल्यापासून परीक्षेच्या सप्टेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ पर्यंतच्या निकालात सरासरी ३० टक्के परीक्षार्थी नापास होत आहेत. ही परिस्थिती निश्चितच समाधानकारक नाही. यावरून वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी येणाऱ्यांचे वाहतुकीबद्दलचे ज्ञान किती तोकडे आहे, हेही लक्षात येते. याची परिणती रस्त्यावर वाहन चालवताना छोट्या छोट्या चुकांमुळे होणारी मोठी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वाहतूक साक्षरता कार्यक्रम आखण्याची गजर आहे. मात्र, हा उपक्रम दरवर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या सुरक्षा पंधरवड्यासारखा कुचकामी ठरू नये.

नेमका काय बदल झाला?
गेल्यावर्षी आैरंगाबाद परिवहन कार्यालयात आरटीओ म्हणून रुजू झाल्यावर सर्जेराव शेळके यांनी लर्निंग लायसन्स प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या वर्षीच सप्टेंबरमध्ये जुनी परीक्षेची पद्धत मोडीत काढून संगणकीय परीक्षा पद्धती अमलात आणली. प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न प्रत्येक वेळी रँडम पद्धतीने येऊ लागले. विशेष म्हणजे परीक्षा कक्षात प्रवेशापासून दलालांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे वाहतूक नियमांची उजळणी करता थेट परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षा संपताच कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर "क्षमस्व! आपण अनुत्तीर्ण झाला आहात' असा संदेश झळकू लागला. परिणामी वाहतूक नियमांत "ढ' ठरणाऱ्या चालकांना पुन्हा पुन्हा परीक्षा द्यावी लागत आहे.
पहिल्याच महिन्यात ५५% नापास
सप्टेंबर२०१५ या महिन्यात संगणकीय प्रणालीचा अवलंब करण्यात आला. तेव्हा या महिन्यात २८३ जणांनी लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा दिली होती. यामध्ये तब्बल १६१ परीक्षार्थी नापास झाले, याचा टक्केवारीत निकाल ५६.४९ इतका आहे. आजही सरासरी ३० टक्के उमेदवार वाहतूक नियमांच्या परीक्षेत नापास होत आहेत. याचा सर्वांनीच धसका घेतला आहे. दलाल उमेदवारांना नियमांची उजळणी करून येण्याचा सल्ला देत आहेत. मोटार ड्रायव्हिंग स्कूल्सनी तर शिकाऊ ड्रायव्हर्ससाठी वाहतूक नियम पुस्तिकाही छापल्या आहेत.

गैरसमजावरून पडदा उठला
पूर्वी दलालांच्या मदतीने सर्वच परीक्षार्थी परीक्षा पास होत असत. त्यामुळे आपल्याला नियम माहिती असल्याचा गैरसमज ठाम होत होता. कारण परीक्षेत पास होण्यापुढे कोणीच विचार करत नाही. निकाल उत्तीर्ण झाल्याचे दिसत होते. त्यामुळे याबाबतचा गैरसमज उघड होत नव्हता. मात्र, लर्निंगसाठी नव्याने लर्निंगची गरज असल्याचे वाहनधारकांना कळत आहे.

१५ मिनिटांत लायसन्स
वाहतूक नियमांवर आधारित परीक्षेत १५ प्रश्न विचारले जातात. यापैकी प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास परीक्षार्थी उत्तीर्ण होताे. यात लेखी ११ आणि चिन्ह ओळखण्याबाबतच्या प्रश्नांचा समावेश असतो. परीक्षेत एका प्रश्नासाठी सरासरी ३० सेकंदांचा वेळ दिला जातो. परीक्षेचा शेवटच्या प्रश्नाच्या पर्यायासमोर क्लिक करताच स्क्रीनवर निकाल जाहीर होतो. पास झाल्यास "अभिनंदन! आपण उत्तीर्ण झाला आहात', असा तर नापास झाल्यास "क्षमस्व! आपण अनुत्तीर्ण झाला आहात', असा संदेश येतो. तसेच परीक्षा झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांत उमेदवाराला लर्निंग लायसन्स दिले जाते.

अभ्यास क्रम निश्चित
संगणकावर परीक्षा देण्यासाठी परिवहन विभागाने मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. त्यात वाहतूक नियमांशी संबंधित एकूण ४२६ प्रश्नांचा समावेश असून यातील ११४ प्रश्न‍ हे चिन्हांशी संबंधित, तर उर्वरित ३१२ प्रश्न वाहतूक नियम, कायदा वाहन चालवताना विशिष्ट परिस्थितीत काय निर्णय घ्याल, यावर आधारित आहेत. परीक्षेत याच ४२६ प्रश्नांपैकी १५ प्रश्न विचारले जातात.
जुना डेटाच उपलब्ध नाही
जुन्या पद्धतीने लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा कक्षात एका स्क्रीनवर प्रश्न दिसायचा आणि ऑडिओद्वारे सर्वांना काही आवाज ऐकवला जाई. कक्षातील उमेदवार आपल्यासमोरील बोर्डावरील दोनपैकी एक बटण दाबत असे. तेव्हा दलाल उमेदवारांना थेट उत्तरे सांगत असल्याने मास कॉपी होऊन ९० ते शंभर टक्क्यांपर्यंत निकाल लागत असे. परंतु, संगणक प्रणाली लागू झाल्यापासून चित्र बदलले. मात्र, या दोन्ही पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे पूर्वीचा डेटाच उपलब्ध नाही.

नियमांची माहिती आवश्यक
निश्चितच नापास होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. पण वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे असल्यास वाहतूक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. टान्सपोर्ट लायसन्ससाठी वाहतुकीसंबंधी आरटीओमध्ये डेमो दिला जातो. -सर्जेराव शेळके, आरटीओ

सीसीटीव्हीचे फुटेज आरटीओंच्या केबिनमध्ये
एकाच स्क्रीनवर प्रश्न दर्शवून परीक्षार्थींनी उत्तर देण्याची पद्धत मोडीत काढून संगणकीय परीक्षेची सुरुवात करण्यात आली. यानंतर दलालांना परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापासूनही मज्जाव करण्यात आला. जर कोणी परीक्षा कक्षात गेलेच किंवा तेथे काही गडबड सुरू असेल तर त्याचे लाइव्ह फुटेज थेट आरटीओ सर्जेराव शेळके यांच्या केिबनमध्ये दिसते. अर्थात परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे कनेक्शन आरटीओंच्या कक्षात जोडण्यात आले आहे.

अशी आहे ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळालेल्या वेळेनुसार आरटीओमध्ये परीक्षेसाठी हजर राहावे. परीक्षा कक्षाच्या प्रवेशद्वारावरच सहायक निरीक्षक कागदपत्रांची छाननी करतात. पुढील खिडकीवर शुल्क भरावे. त्यानंतर वेब कॅमेऱ्यावर फोटो काढून उमेदवाराची माहिती संगणकात अपलोड केली जाते. येथूनच मेन सर्व्हरला ही माहिती पाठवली जाते आणि दिलेल्या नंबरप्रमाणे संगणकासमोर परीक्षेसाठी बसवले जाते.
बातम्या आणखी आहेत...