आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: नंग्या तलवारीने तिघांवर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बजाजनगरातील द्वारकानगरीत घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी. - Divya Marathi
बजाजनगरातील द्वारकानगरीत घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी.
वाळूज- भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन ते तरुणांनी केलेल्या सशस्त्र प्राणघातक हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. ही थरारक घटना बजाजनगर कामगार वसाहतीच्या द्वारकानगरीतील भररस्त्यावर सोमवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली.पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार चाकू जप्त केला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ही घटना क्षुल्लक वादावरून झाली असून एका आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती वाळूज एमआयडीसीचे पाेलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी दिली. अटकेत विकी गोरखनाथ हेगडे (२७,रा.एमआयडीसी वसाहत, मोरे चौक, बजाजनगर) याचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उमेदवारांकडून सध्या प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येथील द्वारकानगरी भागातही उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या सुरू आहेत. घटनेच्या दिवशी विविध पक्षांचे उमेदवार प्रचार करीत असताना या गर्दी पाठोपाठ अचानक दुचाकीवरून ते तरुण आले. त्यातील काही तरुणांच्या हातात नंग्या तलवारी,चाकू कोयते होते. त्यांनी आपल्या दुचाक्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील रस्त्यालगत उभ्या करून धावत जात विरुद्ध बाजूने दुचाकीवरून येणाऱ्या तिघा तरुणांवर हल्ला चढविला. काही कळायच्या आत त्यांनी बाळू ऊर्फ अनिरुद्ध भरत मिसाळ (२५ रा. लिलासन्स सोसायटी,बजाजनगर) याच्या गळ्याजवळ शस्त्राने जबर वार केले. त्यात तो रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. तरी त्याच्यावर हल्लेखोर तरुणांचे वार सुरूच होते. या शिवाय,त्याचा मित्र बंड्या ऊर्फ विशाल किशोर फाटे (२६ रा.वडगाव कोल्हाटी)याच्यासह शिंदे नावाच्या दुसऱ्या मित्रावरही शस्त्रासह हल्ला केला. त्यात तिघेही जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तरुण आपल्या दुचाक्या घेऊन पसार झाले. 

सर्वांनी घेतली बघ्याची भूमिका 
घटना घडत असताना परिसरात उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या सुरू होत्या. कार्यकर्त्यांचा मोठा ताफा त्यांच्यासोबत होता. मात्र,जखमींवर वार हाेत असताना समोर कोणीही आले नाही.अनेकांनी ही घटना लाइव्ह बघितली.अंगावर शहारे आणणारी घटना घडून गेल्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना त्यांचे काम करताना अडथळा निर्माण झाला. तेव्हा पोलिसांनी बघ्यांना आवर घालून जखमी अनिरुद्ध मिसाळ, विशाल फाटे शिंदेला उपचारासाठी खासगी वाहनातून रुग्णालयात हलविले. 

मित्राच्या नातलगाला त्रास देत असल्याचे कारण 
अनिरुद्ध मिसाळ, विशाल फाटे, सचिन कुसळकर शिंदे असे हे चौघे जिवलग मित्र आहेत. यातील सचिन कुसळकर यांच्या एका नातलगाला महेश, बंड्या त्याचा मित्र सचिन हे त्रास देत असल्याचे सचिन कुसळकर याने अनिरुद्धला सांगितले. तेव्हा रविवारी अनिरुद्ध सचिन कुसळकरने मिळून महेश, बंड्या सचिन या तिघांना मारहाण करून तंबी दिली होती. या कारणावरून महेश, बंड्या सचिनने हा प्रकार अर्जुन जाधवला सांगितला. तेव्हा तो संतापला.त्याने अनिरुद्ध सचिन कुसळकरला अद्दल घडविण्याचा निर्णय घेतला. अर्जुन जाधवसह इतर मित्र प्राणघातक शस्त्रांसह तीन दुचाकींवर निघाले. तेव्हा त्यांची भेट द्वारकानगरीत झाली.
 
असा करण्यात आला हल्ला 
ते हल्लेखोर हातात नंग्या तलवारी, कोयता इतर शस्त्रे घेऊन पळत घटनास्थळी गेले. त्यात काही हल्लेखोर काळ्या शर्ट-पँटमध्ये तर काही हल्लेखोर आकाशी रंगाच्या शर्टमध्ये असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. हल्ल्यानंतर पुन्हा ते आले तसे पसार झाले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत तपास करीत आहेत. 

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन जाधववर मारहाण करणे, धमकावणे, खंडणी यासह बंदूक (कट्टा)विक्री आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच दुसरा आरोपी विक्की हेगडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी दिली. सदरील आरोपींची परिसरात चांगलीच दहशत असल्यामुळे अनेकदा लहान-मोठे गुन्हे मारामाऱ्या होऊन सुद्धा सर्वसामान्य नागरिक यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची हिंमत करत नाहीत. त्यामुळे या आरोपितांची वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत हिंमत दहशत वाढत असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...