आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारशे शिक्षक-शिक्षकेतरांना दोन महिन्यांपासून वेतन नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अतिरिक्त ठरलेल्या ९८ शिक्षकांच्या इतर शाळांमध्ये सेवा समायोजनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. टाळाटाळ करणाऱ्या २७ शाळांमधील सुमारे ३५० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील प्रत्येकी दोन कोटींचे वेतन होणे गरजेचे होते. शिक्षण विभागाने सर्वांचे वेतन थांबवल्यामुळे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात येत आहे. 
 
शिक्षकांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अध्यापनाचे कार्य केले आहे, मात्र त्यांचे वेतन करण्यात आलेले नाही. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांच्या व्यवस्थापन मंडळाला याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. ९८ पैकी निम्यापेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झाले आहे. 

ज्या शाळांनी समायोजनास नकार दिला आहे अशा शाळांच्या संस्थाचालकांच्या विरोधात किंवा शाळेचे प्रशासन पाहणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी शिक्षण विभागाने २७ शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले आहे. सुमारे ४०० जणांचा प्रश्न असून त्यांचे दरमहा अंदाजे दोन कोटींचे वेतन अदा केले जाते.
 
यावर काहीच तोडगा निघत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या वतीने शिक्षण आयुक्त धीरजकुमार आणि शिक्षण उपसंचालक वैजिनाथ सांडके यांना निवेदन देण्यात आले. दोन महिन्यांचे थकीत वेतन आता ऑफलाइन पद्धतीने करण्यात यावे, अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित समायोजन करण्यात यावे, संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि वेतन थांबवणाऱ्या शिक्षणाधिकारी आणि वेतन पथकाच्या अधीक्षकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
 
सिद्धेश्वर हायस्कूल सिल्लोड, स्वामी विवेकानंद बोधेगाव, यशवंत विद्यालय पालोद, माध्यमिक विद्यालय देवळाई, प्रबोधन विद्यालय शेलगाव, प्रभात हायस्कूल निधोना, सरस्वती भुवन विद्यालय पिंप्रीराजा, गणेश विद्यालय गंगापूर, राजाबाई धूत, पैठण येथील श्री नाथ हायस्कूल, छत्रपती आणि जिजामाता विद्यालय आदी ग्रामीण भागातील शाळेच्या शिक्षकांचेही वेतन रखडले आहे.
 
ग्रामीण भागातील शाळा नामवंत शाळांचाही समावेश 
हडको येथील बळीराम पाटील हायस्कूल, रामनगर येथील सुशीलादेवी देशमुख विद्यालय, शारदा मंदिर विद्यालय, आ. कृ. देशमुख विद्यालय, गारखेडा येथील ज्ञानप्रकाश विद्यालय, विज्ञान वर्धिनी हायस्कूल, संस्कार प्रबोधिनी, माँटेसरी, बाळापूर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल, सरस्वती भुवन प्राथमिक विद्यालय, एन-३ येथील एमआयटी आणि यशवंत विद्यालयातील शिक्षकांचा समावेश आहे. 

चोर सोडून संन्याशाला फाशी 
 - 
अतिरिक्त ठरलेल्याजिल्ह्यातील शिक्षकांचे सेवा समायोजन व्हावे, शासनाची ही भूमिका योग्य आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे यापूर्वीच त्यावर तोडगा निघणे गरजेचे होते. त्यांचे सेवा समायोजन करण्यास नकार देणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापकांचे वेतन थांबवण्याची कारवाई झाली असती तर मी समजू शकलो असतो, पण सर्वच शिक्षकांचे वेतन थांबवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे.
-सुभाष महेर, सरचिटणीस, मनसे शिक्षक-शिक्षकेतर संघटना 
बातम्या आणखी आहेत...