आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर: कारवाईचा बडगा; अशुद्ध पाणीपुरवठ्याचा भंडाफोड, ग्रामसेवक, अधिकाऱ्याला नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे ग्रामीण भागात करण्यात येणारा अशुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना जीवघेण्या आजाराला निमंत्रण देणारा ठरत आहे. या गंभीर प्रकाराचा भंडाफोड भाजपाचे पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत यांनी गेल्या शुक्रवारी पंचायत समितीच्या बैठकीत केला होता. तालुक्यातील सावखेडखंडाळा गावाला कित्येक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार  उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पाणी वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या सावखेडखंडाळ्याच्या ग्रामसेवकासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तडकाफडकी कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे औदार्य दाखवले.
 
  शासन टंचाई उपाययोजनेतून लाखो रुपये खर्च टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी करत असताना प्रशासकीय पातळीवर टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा कोणत्या गुणवत्तेचा होतो यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी विशेषत: अकरा क्षेत्रीय अधिकारी यांचे टँकरच्या फेऱ्यावर करडी देखरेख ठेवण्यासाठी नेमणूक केली आहे. दरम्यान नेमणूक केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी चार महिन्यांच्या कालावधीत टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही याची पाहणी केली नसल्याचे  चव्हाट्यावर आले. ग्रामसेवक व टँकर लॉबीतील ठेकेदार यांच्या आदेशावरच क्षेत्रीय अधिकारी बसल्या जागी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा कागदोपत्री अहवाल वरिष्ठांना सादर    करत होते. पाणीटंचाई उपाययोजनांवर सरकार लाखो रुपये खर्च करून जनतेची तहान भागवत असताना प्रशासनातील अधिकारी ठेकेदाराशी संगनमत करून आर्थिक मलिदा लाटत असल्याचा प्रकार सावखेडखंडाळा येथे अशुद्ध पाणीपुरवठा प्रकारामुळे उघडकीस आला.
 
आठ दिवसांआड पाणीपुरवठा, हंडाभर पाण्यासाठी खामगावात महिलांची पायपीट
खामगाव - गावाला  पाणीपुरवठा करणारी एक विहीर असून, या विहिरीमध्ये दिवसभरात सहा खेपा  टँकरच्या होतात. परंतु योग्य नियोजन नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे चित्र खामगाव परिसरात दिसून येत आहे.  जर पाण्याचे योग्य नियोजन केल्यास गावास किमान पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावास चक्क आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी जलवाहिनीवर मर्जीतल्या लोकांनी अवैध नळ कनेक्शन घेतल्याने अर्ध्या गावात चक्क दोन महिन्यांपासून नळांना पाणीच येत नाही. त्यामुळे येथील महिलांना शेजारी शेतात एक किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे.   

ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना भेटून सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र,यात काहीच सुधारणा होत नाही  सखलादी बाबा वस्ती येथील महिलांना एक कि.मी. अंतरावरून साचलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागते. हे पाणी पिण्यायोग्य नाही. परंतु नाइलाजास्तव पाण्याअभावी याचा वापर करावा लागतो. मात्र, अशा पाण्यामुळे अनेक आजारांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. खामगाव ग्रामपंचायतीला चौदाव्या वित्त आयोगातून अकरा लाख रुपये नवीन नळ योजनेसाठी आले आहेत.
 
वस्तीवर टँकर देता येत नाही
- वस्तीवरील लोकांना टँकर देण्यासाठी मी सतत पंचायत समितीत खेट्या मारल्या. वरिष्ठांना वस्तीवर आणून दाखवले परंतू वस्त्यांवर टँकर देऊन शकत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गावात काही भागात पाणी जाण्यास अडचणी आहेत. लवकरच नवीन पाईपलाईचे काम सुरू करणार आहोत.
- मनिषा रवि म्हस्के, सरपंच
 
- सकाळी उठले की अाधी एक किलोमीटर रानात पायपीट करून जवळच्या शेतातील विहिरीतून साचलेले पाणी शेंदून आणावे लागते. नळाला कधीच पाणी येत नाही. लाइन बंद केली की काय काही कळत नाही.
- वंदना सोनवणे,  गृहिणी
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)   
बातम्या आणखी आहेत...