आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटींचा महसूल मिळणारा बहि:स्थ अभ्यासक्रम बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विस्कळीतपणाचे आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. पदव्युत्तर पदवीला चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम (सीबीसीएस) लागू केल्यामुळे बहि:स्थ अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार होते. त्यामुळे विद्यापीठाने सर्व विषयांतील बहि:स्थ अभ्यासक्रमालाच ‘ब्रेक’ दिला आहे. यामुळे दरवर्षी मिळणारा जवळपास एक ते दोन कोटींचा महसूल बुडण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र सावरासावरीसाठी पुढील वर्षीपासून आपण यूजीसीची मान्यता घेऊन ‘बहि:स्थ’ अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.

नोकरी, रोजगारांत गुंतलेले, आर्थिक परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाचे स्वप्न अधुरे राहिलेले किंवा विवाहित महिलांचेही उच्चशिक्षण पूर्ण व्हावे म्हणून विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाप्रमाणे बहि:स्थ अभ्यासक्रम सुरू केला होता. या अभ्यासक्रमातून सुमारे ते कोटींपर्यंत विद्यापीठाला महसूल मिळायचा. यंदापासून सर्वच पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांना (सीबीसीएस) श्रेयांक पद्धत लागू केल्यामुळे बहि:स्थ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता बळावली होती. बहि:स्थ अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची श्रेयांक पद्धतीनुसार टीचिंग-लर्निंग प्रक्रिया होणे गरजेचे झाले होते. विद्यापीठाने मात्र श्रेयांक पद्धत लागू करण्यापूर्वी बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांचा काहीच विचार केलेला नव्हता. एखादे केंद्र उभारून त्या ठिकाणी शनिवारी-रविवारी वर्ग घेण्याऐवजी विद्यापीठाने हा अभ्यासक्रम रद्दच करण्याचा ‘अफलातून’ निर्णय घेतला आहे. यंदा प्रवेश घेतलेले किंवा पुढे घेऊ इच्छिणारे पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा मार्ग पत्करावा लागणार आहे. एम. ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित आदींसह किमान १६ विषयांचा अभ्यास करू इच्छिणारे विद्यार्थी या निर्णयामुळे विद्यापीठीय अभ्यासाला मुकले आहेत. एम. ए.साठी प्रत्येकी दोन हजार रुपये शैक्षणिक शुल्क आणि ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. मागील वर्षी ८२७७ विद्यार्थ्यांनी बहि:स्थ अंतर्गत प्रवेश घेतला. एवढ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला ‘ब्रेक’ बसणार असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान ओढवून घेतले आहे.

आजीवन शिक्षण विस्तार सेवेला जोडणे शक्य होते
विद्यापीठातआजीवन शिक्षण विस्तार सेवा केंद्रामार्फत जवळपास अशीच अॅक्टिव्हिटी ६० महाविद्यालयांच्या केंद्रांमार्फत सुरू आहे. यापैकी काही विशिष्ट महाविद्यालयांत ‘टीचिंग’ची सोय करून दिली असती तर ‘बहि:स्थ’वर पाणी सोडण्याची गरजच पडली नसती. मात्र, कुलगुरूंनी या संदर्भातील जबाबदारी प्राध्यापकांकडे देण्यास खूपच दिरंगाई केली. संचालक डॉ. किशन धाबे की शिक्षणशास्त्राचे डॉ. प्रशांत पगारे यांच्याकडे काम सोपवण्याचा निर्णय कुलगुरू अखेरपर्यंत घेऊ शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुढील वर्षी प्रवेश देऊ
दिल्लीयेथील बहि:स्थ शिक्षण प्राधिकरण आता यूजीसीमध्ये विलीन झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाला आता अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यूजीसीची मान्यता घ्यावी लागणार आहे. तोपर्यंत आपण बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी टीचिंगची सोय करून देऊ. बहुधा पुढील वर्षापासून पुन्हा प्रवेश देण्यात येतील. -डॉ.बी. ए. चोपडे, कुलगुरू