आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात परीक्षा नियंत्रकासह संवैधानिक पदे वर्षापासून रिक्तच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महत्त्वाचे असलेले परीक्षा नियंत्रक पद वर्षभरापासून रिक्त आहे. तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी पद सोडून शुक्रवारी (७ ऑगस्ट) वर्ष पूर्ण होत आहे तरीही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अद्याप पदस्थापनेची प्रक्रिया सुरू केली नसल्यामुळे विद्यापीठ कायद्याचे कलम १८ (१) (अ) नुसार हे पद आता राज्य शासनाने भरणे गरजेचे आहे. त्याशिवाय कुलसचिवपद आठ महिन्यांपासून, तर वित्त लेखाधिकारी पद वर्षापासून रिक्तच आहे.

कुलगुरू डॉ. चोपडे यांनी जून रोजी पदभार घेतल्यानंतर डॉ. अशोक चव्हाण यांनी सुमारे दोन महिने परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०१४ रोजी पदभार सोडला अन् वनस्पतिशास्त्र विभागात रुजू झाले. कुलगुरूंच्या सूचनेप्रमाणे ऑगस्ट २०१४ रोजी रसायनशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. सुरेश गायकवाड यांनी परीक्षा नियंत्रकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यानंतर डॉ. गायकवाड यांनी १४ जानेवारी २०१५ पर्यंत म्हणजेच सहा महिने या पदाचा कार्यभार सांभाळला. मात्र, काही संघटनांनी त्यांना पदावरून हटवण्यासाठी १५ जानेवारी रोजी कुलगुरूंच्या दालनात गदारोळ घातला. त्यांच्यावर अनियमिततेचा आरोप ठेवून संघटनांच्या दबावात कुलगुरूंनीही त्यांना कार्यमुक्त होण्यास सांगितले होते. त्याच दिवशी उपाहाराच्या विश्रांतीपूर्वी वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याकडे पदभार देण्यात आला. डॉ. सरवदे यांनीही सुमारे पाच महिने परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. त्यानंतर कुलगुरू आणि डॉ. सरवदे यांच्यात अनेक कारणांमुळे मतभेदांचे ‘स्फोट’ झाले. डॉ. सरवदे यांच्याच कार्यकाळात विद्यापीठाचा रखडलेला दीक्षांत समारंभ पार पडला. एवढेच नव्हे, तर त्यांनीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दीक्षांत समारंभासाठी येण्यास भाग पाडले. मात्र, तरीही कुलगुरू आणि त्यांचे मतभेद संपले नाहीत. दरम्यान, डॉ. सरवदे यांनी परस्पर कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतल्याचा आरोप ठेवत कुलगुरूंनी त्यांना स्पष्टीकरण मागितले. डॉ. सरवदे यांनी मात्र स्पष्टीकरण देण्याऐवजी राजीनामा देऊन पद सोडून दिले. त्यानंतर काही दिवस परीक्षा विभागाला नेतृत्व नव्हते. मात्र, जून महिन्यात मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची परीक्षा नियंत्रकपदी वर्णी लावण्यात आली. कुलगुरूंनी वर्षभरात तीन ते चार वेळा परीक्षा नियंत्रक बदलल्यामुळे त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, परीक्षा नियंत्रकपदाच्या लेखी परीक्षेसह मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्यासाठी एकही उमेदवार ‘लायक’ नसल्याचे शिक्कामोर्तब करून कुलगुरूंनी कायमस्वरूपी परीक्षा नियंत्रक नेमण्याचे टाळले. आता वर्षभरापासून पद रिक्त असून ३१ मार्च २०१५ रोजी डॉ. लुलेकर निवृत्त झाले. त्यासाठी पुन्हा नव्याने फेरजाहिरात काढण्यात आलेली नसल्यामुळे या प्रक्रियेला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय कुलसचिवपद मागील आठ महिन्यांपासून, तर वित्त लेखाधिकारी पदही सुमारे वर्षभरापासून रिक्तच आहे.
शासनाच्या कोर्टात चेंडू
महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज् अॅक्ट-१९९४ च्या कलम १८ (१) (अ) प्रमाणे परीक्षा नियंत्रकपदाची निवड करण्याचा अधिकार कुलगुरूंना आहे. मात्र, कुठल्याही कारणास्तव हे पद सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त ठेवता येत नाही. असे झाल्यास राज्य शासन एक ते तीन वर्षांपर्यंत परीक्षा नियंत्रकाचे पद प्रतिनियुक्तीवर भरू शकते. प्रतिनियुक्तीच्या काळात कुलगुरूंनी जर हे पद कायमस्वरूपी भरले तर प्रतिनियुक्तीवरील व्यक्तीला पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत रुजू व्हावे लागेल, असे कायद्यातच म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे आज आंदोलन
तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. चव्हाण यांना पदभार सोडून ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे शुक्रवारी दुपारी उपरोधिक आंदोलन करण्यात येणार आहे. रिक्त पदाचा वर्धापन दिन म्हणजेच वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. शहराध्यक्ष राहुल तायडे यांच्या नेतृत्वात प्रशाकीय इमारतीसमोर ‘केक’ कापून हे आंदोलन केले जाईल. या वेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उपस्थित राहाण्याचे आवाहन तायडे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...