आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: निम्म्या शहराला फुकटात पाणीपुरवठा; 50 कोटींवर दरवर्षी सोडावे लागते ‘पाणी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात आहेत तब्बल १ लाख २४ नळ कनेक्शन्स अवैध - Divya Marathi
शहरात आहेत तब्बल १ लाख २४ नळ कनेक्शन्स अवैध
मनपाच्या तिजोरीचा खडखडाट हे शब्द शहरवासीय कायम ऐकत आलेत. कुठलेही विकासकाम करायचे झाल्यास मनपासमोर सर्वात पहिला प्रश्न असतो तो निधीचा. मात्र, निधी उभारण्यात मनपा खरोखर झोकून देऊन प्रयत्न करते काय, हा प्रश्नच आहे. कारण शहरात एकूण नळ कनेक्शन्सच्या निम्मे म्हणजे १ लाख २४ कनेक्शन्स अवैध आहेत. ते सर्व जर नियमित केले तर मनपाच्या तिजोरीत दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये येऊ शकतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पाणीपुरवठा विभाग सध्या रोज सरासरी चार नळ कनेक्शन कट करत आहे. कारवाईची गती हीच राहिली तर सर्व अवैध कनेक्शन कट करायला तब्बल ८५ वर्षे लागतील. त्यामुळे कर्मचारी वाढवणे आणि धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करणे अतिशय गरजेचे आहे. 
 
वैध आणि अवैध नळ कनेक्शनची आकडेवारी काढण्यासाठी मनपाने मागील वर्षी सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये तब्बल १ लाख २४ हजार नळ कनेक्शन्स अवैध, तर १ लाख २९ हजार कनेक्शन्स वैध आढळून आले होते. म्हणजेच जवळपास अर्ध्या शहराला वर्षानुवर्षे फुकटात पाणीपुरवठा सुरू अाहे. सर्वेक्षणानंतर मनपाने हे अवैध कनेक्शन्स नियमित करण्यासाठी अभय योजना सुरू केली; परंतु या योजनेत केवळ ५९६ कनेक्शन्स नियमित झाले.
 
कारवाई करताना येणाऱ्या अडचणी
अवैध नळ कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या पथकाला बऱ्याचदा कारवाई न करताच परतावे लागते. कनेक्शन कट करायला जातात, तेव्हा काही नागरिक लगेच ‘आमचे कनेक्शन वैध आहे,’ असे सांगतात. त्यावर ‘पाणीपट्टी दाखवा,’ असे विचारल्यावर ते नागरिक शोधाशोध करण्याचे नाटक करतात. काहीच नाही चालले तर ‘आता साहेब घरी नाहीत, ते आल्यावर त्यांना विचारते पाणीपट्टी कुठे ठेवली ते. त्यामुळे तुम्ही उद्या या,’ असे सांगून पथकाला माघारी फिरवले जाते. बहुतांश नागरिक तर लगेच नगरसेवक किंवा त्या भागातील एखाद्या पुढाऱ्याला फोन करून पथकावर दबाव आणतात.
 
दरवर्षी सोडावे लागते ५० कोटींवर पाणी
सरासरी एका नळ कनेक्शनच्या माध्यमातून मनपाला वर्षाकाठी चार हजार रुपये मिळतात. जर एक लाख २४ अवैध नळ कनेक्शन नियमित केले तर मनपाच्या तिजोरीत तब्बल ५० कोटी रुपये येऊ शकतात. वर्षानुवर्षे या हक्काच्या ५० कोटींवर मनपाला पाणी सोडावे लागत आहे.
 
दररोज तीन ते चार कनेक्शन्सवर कारवाई
अवैध नळ कनेक्शन्सचा आकडा सव्वा लाखावर असताना दररोज अवघे तीन ते चार अवैध नळ कनेक्शन कट केले जात आहेत. अवैध नळ कनेक्शन्सविरुद्धच्या कारवाईची गती जर हीच राहिली तर सर्व अवैध कनेक्शन्स कट करायला तब्बल ८५ वर्षे लागतील. 
 
पाणीपुरवठा विभागाकडे कर्मचारी कमी
अवैध नळ कनेक्शन्स कट करून नवे कनेक्शन देण्याची जबाबदारी असलेल्या पाणीपुरवठा विभागात अवघे चार अभियंते व सात अभियांत्रिकी सहायक आहेत. अवैध नळ कनेक्शन करण्यासाठी तीन उपअभियंत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. या तीन उपअभियंत्यांना प्रत्येकी एक सहायक असतो. त्यांना पाणीपुरवठ्याशी निगडित सर्व कामे सांभाळून अवैध नळ कनेक्शन्सविरुद्धची कारवाई करावी लागते. यामुळे प्रतिदिन सरासरी तीन ते चार अवैध नळ कनेक्शन्स कट केले जात आहेत.
 
पुढील स्लाइडवर वाचा, ...तरी पाठपुरावा सुरू आणि योजनेबाबत विचार करणार - डी. एम. मुगळीकर, आयुक्त, मनपा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...