आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: जिल्ह्यात ७५ % मतदान; सोमवारी निकाल; अंभई केंद्रावर सर्वाधिक ९४ टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 औरंगाबाद- मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील आठ जिल्ह्यांतून सर्वाधिक मतदार असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात (११ हजार ४४२) सर्वात कमी म्हणजे ७५ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत मतदार केंद्रावर मतदानासाठी फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, दुपारनंतर केंद्रांवर मतदानांसाठी गर्दी दिसून आली. सोमवारी (दि. ६) मतमोजणी होणार आहे. 

अजिंठा : नेत्यांची पाठ
अजिंठा- पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या शुक्रवारी अजिंठा मतदान केंद्रावर २१२ पैकी १९१ शिक्षक मतदारांनी मतदान केले असून या केंद्रावर मतदानाची टक्केवारी ९० टक्के झाली आहे. अजिंठा व गोळेगाव सर्कलमधील अजिंठा, गोळेगाव, शिवना, हळदा, पिंपळदरी, पानवडोद, मादणी, बाळापूर, धोत्रा, उंडणगाव या गावातील शिक्षक मतदारांनी मतदान केले. या वेळी केंद्राध्यक्ष म्हणून एस. एम. केदार, एम. एल. कातडे, मतदान अधिकारी पी. आर. परदेशी यांनी काम पाहिले. पाेलिस कर्मचारी ताहेर शाह, अजय मोतिंगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. मात्र, या केंद्राकडे एकही कार्यकर्ता किंवा पुढारी फिरकला नाही.

कन्नड : ९१ टक्के मतदान 
कन्नड - कन्नड तालुक्यातील ८ मतदान केंद्रांत १ हजार ८३ शिक्षक मतदारांपैकी ९१९ म्हणजे ९०.७२ टक्के मतदान झाले.  कन्नड मतदान केंद्रात ३८४ पैकी ३५० (९१.१५  %), पिशोर ११६ पैकी १०७ (९२.२४ %), चिकलठाण ७५ पैकी ६३ (८४.%), करंजखेड १०६ पैकी ८८ (८३. ०२ %), देवगाव रंगारी १०१ पैकी ९४ (९३.०७ %), चापानेर ८६ पैकी ८५ (९८. ८४ %),नाचनवेल ४० पैकी ३६ (९०.००%), चिंचोली १०५ पैकी ९६ (९१.४३ %) मतदारांनी मतदान केले.

करंजखेड : ७७ पुरुषांनी बजावला हक्क
नागापूर-  कन्नड तालुक्यातील  करंजखेड केंद्रावर नागापूर परिसरातील नागेश्वर विद्यालय नागापूर, महात्मा फुले हायस्कूल करंजखेड, माध्यमिक विद्यालय चिमणापूर, उर्दू हायस्कूल नागापूर, उर्दू मुबारक करंजखेड, नागद, सायगवान येथील शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रांवर एकूण १०६ शिक्षक मतदारांपैकी ७७ पुरुष व ११ महिला शिक्षक मतदारांनी मतदान केले. सरासरी ८३.०१ टक्के मतदान झाले.

अंभई केंद्रावर सर्वाधिक ९४ टक्के मतदान
सिल्लोड- पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांनी आपला आमदार निवडण्यासाठी उत्साहाने मतदान केल्याने तालुक्यात ८९.३५ टक्के मतदान झाले. संस्थाचालकांच्या अधिपत्याखाली असणारे शिक्षक भरती, समायोजनाचे अधिकार  राज्य सरकारने आपल्याकडे घेतल्याने या निवडणुकीत शिक्षक मोकळेपणाने वावरताना दिसला. परिणामी, तालुक्यात असलेल्या एकूण १ हजार ५२ मतदारांपैकी ९४० मतदारांनी मतदान केले. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत संथगतीने सुरू असलेल्या मतदानाने दुपारनंतर वेग घेतला. दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
 
सिल्लोड तालुक्यातील पाच मतदान केंद्रांपैकी अंभई येथे सर्वाधिक ९४ टक्के मतदान झाले. कोणत्याही निवडणुकीत राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग असतोच. विक्रम काळे यांच्यासाठी सिल्लोड येथील मतदान केंद्राबाहेर काँग्रेसचे शहराध्यक्ष मन्सूर काद्री, माजी जिल्हा सरचिटणीस कैसर आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पांढरे तळ ठोकून होते, तर प्रा. सतीश पत्की यांच्यासाठी भाजपचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शहराध्यक्ष विष्णू काटकर, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष शेख जाकेर, तालुका शिक्षण समितीचे सदस्य शामराव आळणे दिवसभर तळ ठोकून होते. 

माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, भाजप विधानसभा मतदारसंघाचे नेते सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, पंचायत समितीचे उपसभापती इद्रिस मुलतानी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीरंग पाटील साळवे, रेणुका बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थाचालक विलास पाटील, जनता सहकारचे संचालक विनोद भोजवाणी, सचिन पाखरे यांनी भेटी दिल्या.

खुलताबाद : तीन केंद्रे
खुलताबाद-  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी खुलताबादेतील तीन मतदान केंद्रांवर एकूण ९१ टक्के मतदान झाले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.  शिक्षक मतदारसंघासाठी खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, बाजारसावंगी, सुलतानपूर या तीन ठिकाणी मतदान केंद्रे होती.  तालुक्यातील तिन्ही मतदान केंद्रे मिळून पुरुष २८९, तर ६९ स्त्री अशी एकूण शिक्षक मतदार संख्या ३५८ होती. यापैकी ३२९ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

गंगापूर : ८६ टक्के मतदान
गंगापूर- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज झालेल्या मतदानात गंगापूर तालुक्यात एकूण ८५.९३ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी तालुक्यातील तीन मतदान केंद्रांवर ८८३ मतदार होते. त्यामध्ये आज झालेल्या मतदानात गंगापूर शहरातील मतदान केंद्रावर २६८ पैकी २४० जणांनी मतदान केले. वाळूज केंद्रावर ४०४ पैकी ३२५, लासूर स्टेशन येथे २११ पैकी १७८. तिन्ही मतदान केंद्रे मिळून ७४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नाचनवेल : ४० मतदार
नाचनवेल- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाचनवेल येथील निवडणूक केंद्रावर एकूण  ९० टक्के मतदान झाले. येथील केंद्रावर नाचनवेलसह 
पिंपरखेडा, जवखेडा, आडगाव, मोहरा येथील एकूण चाळीस मतदारांपैकी ३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केंद्राध्यक्ष म्हणून एस. एस. चव्हाण, सूक्ष्म निरीक्षक एस. के. हातगाव, मतदान अधिकारी आर. व्ही. भदाने, एस. टी. जाधव, पी. व्ही. सूर्यवंशी यांनी काम पाहिले. यासाठी सहायक क्षेत्रीय अधिकारी शिवाजी भाग्यवंत यांच्यासह सपोनि अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. एल. दिंडे, बीट जमादार जगन्नाथ उबाळे, पोलिस नाईक एस. बी. बोर्डे यांनी चोख बंदोबस्त राखला.

करमाड : ९६ टक्के मतदान
करमाड- करमाड मतदान केंद्रावर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १३९ पैकी १३६ शिक्षक मतदारांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. करमाड केंद्रावर ९५.७७ टक्के मतदान झाले.
बातम्या आणखी आहेत...