आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे जलसंवर्धनात श्रमदान; दुष्काळाशी दोन हात करण्यास सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- दुष्काळाशी दोन हात व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी अभिनेता अामिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप पाणी फाउंडेशनअंतर्गत महाराष्ट्रातील कामाला खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे महाश्रमदानाने रविवारी सुरुवात करण्यात आली.
 
पाणी फाउंडेशनचे सचिव सत्यजित भटकळ, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या सहकार्याने शाळकरी मुला-मुलींसह आमदार प्रशांत बंब आणि गोळेगाववासीयांनी श्रमदानास सुरुवात केली. यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील शाळकरी मुलेही सहभागी झाली होती.

७ वर्षांचा चिमुकलाही सरसावला
- श्रमदान करताना जय जवान जय किसान, भारत माता की जयच्या  दिल्या उत्स्फूर्त घोषणा 
- खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव परिसरात ४५ दिवसांत काम पूर्ण होणार.
- श्रमदानासाठी आलेल्या मुलांच्या भोजनाची ग्रामस्थांच्या वतीने व्यवस्था. महिलांचाही या जलनियोजनाच्या कार्यात उत्स्फूर्त सहभाग.
 
सत्यमेव जयते वॉटर कप: दुष्काळाशी दोन हात करण्यास गोळेगावात महाश्रमदानाने सुरुवात
दुष्काळाशी दोन हात व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी अभिनेता अामिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप पाणी फाउंडेशनअंतर्गत महाराष्ट्रातील कामाला खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे महाश्रमदानाने रविवारी (दि. ९) सुरुवात करण्यात आली. पाणी फाउंडेशनचे सचिव सत्यजित भटकळ, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या सहकार्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ६५० मुला-मुलींसह आमदार प्रशांत बंब आणि गोळेगाववासीयांनी श्रमदानास सुरुवात केली आहे. या कामात ७ वर्षांच्या चिमुकल्यांसह वृद्धांनीही सहभाग नोंदवून दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. या वेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी निधी पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अार्दड, जिल्हा कृषी अधीक्षक संजू पडवळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पाणी फाउंडेशन स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील ३७ गावे सहभागी झाली आहेत. भगवान महावीर यांच्या जयंतीच्या औचित्यावर गोळेगावातून श्रमदानाने सुरुवात करण्यात आली. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील बीजेएस होस्टेल, वाघोली येथील विद्यालयातील ६५० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले श्रमदान करत आहेत. पहाटे पाच वाजता गोळेगाव गट नंबर ९४ मध्ये सर्वांनी एकत्र येत हातात फावडे, टिकास, टोपले घेऊन श्रमदानास सुरुवात केली. बांधावर चऱ्या खोदून झाडे लागवडीसाठी खड्डे खोदले.  जय जवान जय किसान, भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर की जय, अहिल्याबाई होळकर की जय अशा घोषणा देत सर्वांमध्ये श्रमदानासाठी उत्साह भरला गेला. सकाळी १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी डोंगर परिसरात श्रमदान केले. 

सकाळी १० वाजेनंतर श्रमदान करणाऱ्या मुलांना सभामंडपात नाष्टा देण्यात आला. यानंतर आमदार बंब, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी निधी पांडे, सत्यजित भटकळ, शांतीलाल मुथा, मधुकरराजे अार्दड, संजू पडवळ, सरपंच जोशी, जैन संघटनेचे गौतम संचेती यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ याविषयी माहिती दिली. जैन संघटनेच्या वतीने पाणी फाउंडेशनच्या कामासाठी जेसीबी, पोकलेन मोफत देण्यात येतील, असे मुथा यांनी सांगितले. विभागीय आयुक्त भापकर यांनी श्रमदान करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत गोळेगावकरांच्या कामात पुढाकार पाहून शासनाच्या वतीने पाणी फाउंडेशन कामासह इतर कामाला लागणारी मदत  दिली जाईल, असे आश्वासन दिले.  जैन संघटनेचे पारख जैन यांनी सूत्रसंचालन,  आभार सरपंच संतोष जोशी यांनी मानले.

अख्खे प्रशासन झाले सहभागी
विभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तहसीलदार अरुण जऱ्हाड, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. वाय. गवंडर, बांधकाम उपअभियंता केंद्रे, तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, कृषी सहायक यांच्यासह आमदार बंब, जिल्हा परिषद सदस्य प्रा. सुरेश सोनवणे, एल. जी. गायकवाड,भीमराव खंडागळे, पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश अधाने, सरपंच  जोशी,  युवराज ठेंगडे, रेखा चव्हाण, प्रभाकर शिंदे, दिनेश अंभोरे आदी सहभागी झाले. 

शस्त्रक्रिया झालेली असूनही श्रमदान  
ग्रा. पं.  सदस्या हिराबाई म्हस्के यांची दीड महिन्यापूर्वी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया झालेली असतानाही त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला.  त्या म्हणाल्या, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची मुले-मुली या ठिकाणी श्रमदानासाठी येत असतील तर मी का नाही? माझ्यासह गावातील लहानग्यांसह मोठेही घराला कुलूप लावून श्रमदान करत आहेत. 

४५ दिवस चालणार काम
माथा ते पायथा याप्रमाणे ४५ दिवसांत हे काम होत आहे. गट नं. १ ते ३४२ गटातील एक हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर विविध कामे करण्यात येणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...