आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया...पहाटे 6 वाजता आंबेडकर जयंती साजरी करून श्रमदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- हिंदी चित्रपट अभिनेता अामिर खान याच्या पाणी फाउंडेशनमधील वॉटर कप स्पर्धेत धारूर तालुक्यातील कारी हे लहानसे  डोंगरातील गाव झपाटून कामाला लागले आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजता कामाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. आठ दिवसांपासून सुरू असलेले श्रमदानाचे काम येत्या ४५ दिवसांत पूर्ण करण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.   

धारूर तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपमध्ये ४६ गावांनी सहभाग घेतला आहे. यापैकी कारी, आवागाव, सुरणरवाडी, जायभायवाडी, चाटगाव आदी गावांनी प्रत्यक्ष श्रमदान केले आहे.  बालाघाटाच्या डोंगर पायथ्याशी कारी गाव वसले असून  २७००  लोकसंख्या  असलेल्या या गावाचे भौगोलिक क्षेत्र १६६५ हेक्टर आहे. शिवारातील पाणी  शिवारातच अडवून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या वाॅटर कप स्पर्धेत दोन महिन्यांपूर्वीच  कारी गावाने सहभाग नोंदवला. माथ्यापासून  पायथ्यापर्यंत  कशी कामे करता येतील याचा नियोजनबद्ध आराखडा तयार  करण्यात आला आहे. 

ज्या गावामध्ये  श्रमदानातून नियोजनबद्ध कामे करण्यात आली आहेत, अशा गावांना राज्यस्तरावर ५० लाखांचे प्रथम, ३० लाखांचे द्वितीय, तर  २५ लक्ष रुपयांचे  तृतीय पारितोषिक पाणी फाउंडेशन  देणार आहे. या स्पर्धेत कारी गाव उतरले असून आपले नशीब आजमावत आहे. गावातील दीपक मोरे, शारदा सुरनर, मुक्ताबाई मोरे, रतन मोरे, राजेंद्र मोरे या पाच जणांची वॉटर कप प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रशिक्षणानंतर गावात यंत्राच्या साहाय्याने लोकसहभागातून शेततळे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, खोल समतल चर  अशी २ लाख ५९ हजार ७५० घनमीटरची कामे झाली आहेत. 

ग्रामस्थांकडून प्रति व्यक्ती ६ घनमीटरप्रमाणे १६ हजार ५०० घनमीटर कामे करण्यात येणार आहेत. यात  समतल चर, मातीबांध, गॅलियन  बंधारे आदी कामांचे नियोजन करण्यात  आले असून वृक्षारोपण, मातीपरीक्षण व ठिबक सिंचन ही कामे करण्यात आली आहेत. शुक्रवारी सकाळी जायभायवाडी येथेही  पत्रकार अनिल महाजन, प्रकाश काळे, सय्यद शाकेर, सुनील कावळे, नागनाथ सोनटक्के आदींनी श्रमदान केले.  

२०० घनमीटर काम पूर्ण   
सकाळी साडेपाच  वाजेपासून महिला, पुरुष व वृद्ध  श्रमदान करत असून शुक्रवारी कामाच्या ठिकाणीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून सकाळी श्रमदानाच्या कामास सुरुवात केली. २०० घनमीटर काम पूर्ण झाले आहे. ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. २२ मे २०१७  पर्यंत काम पूर्ण करण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.   

गावाच्या एकजुटीमुळे यश  
कारी ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजल्यामुळे वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करण्यास उत्साह वाढला आहे. राज्यस्तरावर गाव प्रथम येईल, अशी अपेक्षा आहे . सकाळी सहा वाजेपासून ग्रामस्थ श्रमदान करत आहेत. 
- दीपक मोरे, ग्रामस्थ, कारी.
बातम्या आणखी आहेत...