आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगाव तालुक्यातील निम्म्या गावांत तीव्र पाणीटंचाई, स्थानिक प्रशासनाचे पाणीटंचाई दूर करण्याकडे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- सोयगावातील निम्म्याहून अधिक गावांत निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईने नागरिक होरपळले असताना पंचायत समितीच्या कागदावर मात्र आठच गावांत पाणीटंचाई असल्याचे चित्र शासकीय अधिकाऱ्यांनी निर्माण केले आहे. पण तालुक्यातील निम्म्या गावांत पाणीटंचाई भीषण झाली आहे.   
 
सोयगाव वगळता तालुक्यातील निम्म्या गावांत पाणीटंचाईची भीषण दाहकता पसरली आहे. काही गावात नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. परंतु पंचायत समिती आणि तहसीलच्या पाणीटंचाई निवारण विभागांनी केवळ आठच गावांत पाणीटंचाई असल्याचे कागदोपत्री दाखविल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक हैराण झाले आहेत. गोंदेगाव, बनोटी या भागातील धरणे कोरडीठाक झाली आहेत. त्यामुळे या भागातील ३९ गावांचा पाणीपुरवठा कायमचा ठप्प झाला आहे.  
 
फर्दापूर गावात केवळ दिवसातून एकाच टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. महिनाभरापासून वाकडी गावाचा टँकरचा प्रस्ताव मंजुरीअभावी धूळ खात पडून असल्याने पाचोरा (जि. जळगाव) येथून विकतचे पाणी आणून ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागात आठ गावांचे विहीर अधिग्रहणचे प्रस्ताव पंधरा दिवसांपासून तहसील आणि पंचायत समितीच्या संयुक्त पथकाच्या पाहणीअभावी धूळ खात पडून आहेत. सोयगाव गटातील अकरा गावांची स्थिती बिकट झाली आहे. परंतु ही गावे अद्याप पंचायत समितीच्या कागदावर  नाहीत. सोयगाव गटातील कंकराळा, माळेगाव, पिंपरी, निंबायती, बहुलखेडा, कवली, निमखेडी आणि उमरविहिरे आणि गोंदेगाव-बनोटी गटातील ३९ गावांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करत करावी लागत आहे.

टंचाईची पाहणी करू
-संबंधित गावांच्या ग्रामसेवकांना टँकर आणि विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सद्य:स्थितीत आलेले विहीर अधिग्रहणचे प्रस्ताव क्षेत्रीय अधिकाऱ्याचा पाहणी अहवाल सादर झाल्यावर आदेशित करण्यात येत आहे. उर्वरित गावांच्या पाणीटंचाईची पाहणी करण्यात येईल.  
- अंबादास गायके, गटविकास अधिकारी, सोयगाव

उपाय योजना सुरू
- सोयगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे.  त्यासाठी तहसील कार्यालयात पाणीटंचाई निवारण कक्ष उभारण्यात येऊन तत्काळ विहीर अधिग्रहण करण्यात येत आहे. यावर तात्पुरती उपाययोजना करण्यात येत आहे. तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न तत्काळ मार्गी  लावण्यात येणार आहे.
- संतोष बनकर, तहसीलदार, सोयगाव
बातम्या आणखी आहेत...